बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित व संजूबाबा म्हणजेच संजय दत्त २१ वर्षानंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटात एकत्र काम करत आहेत. मात्र हे दोघे एका चित्रपटाचा हिस्सा असले तरी ते एकत्र कोणतेही सीन एकत्र करणार नाही, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार या दोघांनी नुकतेच एकत्र काही सीन चित्रीत केले आहेत.
मुंबई मिरर रिपोर्टनुसार चित्रपटाच्या सेटवरील एका सूत्राने सांगितले की, आलिया भट आणि वरूण धवन यांच्यासोबत संजय दत्त व माधुरी दीक्षितने तीन दिवस एका ड्रामेटिक सीनचे शूट केले. वरून धवनचे शूटिंग दोन दिवसात आटपले. तर आलिया तीन दिवस सेटवर होती. त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुल्गारियाला रवाना झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त व माधुरी दीक्षित यांनी एकत्र सीन खूप चांगल्याप्रकारे केले आहेत. माधुरीचे एक शूट शेड्युल आहे ज्यात ती मुजरा करणार आहे. या गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान व रेमो डिसुझा करणार आहे. 'कलंक' चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आता हा चित्रपट बनत असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. २१ वर्षानंतर माधुरी दीक्षित व संजय दत्तला रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.