कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नसल्याने चित्रपटसृष्टीत सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार झाली आहे. या सगळ्या परिस्थितीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीच्या मदतीसाठी धावून आली आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकारांना आर्थिक वा अन्नधान्य, किराणा कीट या स्वरूपात मदत करायला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत २५०० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक आणि गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोहचवण्यात आली आहे.
महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली असून या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पदाधिकारी आणि संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि बॉलिवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित मदतीला धावून आली आहे. तिने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली असून त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ आणि कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच तिने इतर कलावंतांना देखील चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.