शोमॅन सुभाष घई यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म 24 जानेवारी 1945 चा आहे. त्यांचा आज 75 वा वाढदिवस असून त्यांनी बॉलिवूडला एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. सुभाष घई यांनी एक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख निर्माण केली असली तरी त्यांना कधीच दिग्दर्शक बनायचे नव्हते. अभिनेता बनण्यासाठी त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
सुभाष घई यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला उमंग, गुमराह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण अभिनयक्षेत्रात त्यांना यश न मिळाल्याने ते दिग्दर्शनाकडे वळले. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटात काही सेकंदांसाठी तरी आपल्याला त्यांची झलक पाहायला मिळते. अभिनय करण्याची त्यांची हौस त्यांची याप्रकारे पूर्ण केली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
सुभाष घई यांनी अनेक अभिनेता-अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. त्यांच्या चित्रपटांमुळेच जॅकी श्रॉफ, रिना रॉय, माधुरी दीक्षित, मिनाक्षी शेषाद्री, मनिषा कोईराला यांना त्यांच्या करियरमध्ये खूप चांगला ब्रेक मिळाला. त्यांनी बॉलिवूडला खूपच चांगले कलाकार दिले आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांच्या परदेस या चित्रपटाच्यावेळेसचा एक किस्सा तर प्रचंड प्रसिद्ध आहे. परदेस या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी सुभाष घई यांनी जवळजवळ 3000 मुलींचे ऑडिशन घेतले होते. 3000 मधून त्यांनी महिमा चौधरीची निवड केली. महिमाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यापूर्वी त्यांनी तिला तिचे नाव देखील बदलायला लावले होते.
खलनायक या चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाच्यावेळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले होते. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याच्या बातम्या मीडियात येत होत्या. या चित्रपटाच्यावेळी माधुरीचे लग्न झाले नसले तरी याच अफेअरच्या चर्चांमुळे सुभाष घई यांनी माधुरीकडून नो प्रेग्नन्सी क्लॉज साईन करून घेतला होता. संजय आणि माधुरीने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान लग्न केले आणि माधुरी गरोदर राहिली तर चित्रपटाच्या चित्रीकरणावर परिणाम होईल असे टेन्शन त्यांना आले होते असे म्हटले जाते.