धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) नृत्याचे लाखो चाहते आहेत. माधुरीचं सुंदर हास्य आणि तिचा जबरदस्त डान्स यामुळे तिने ८०-९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या माधुरीची अनेकांना भुरळ पडली. माधुरीचं हे टॅलेंट खरंतर तिच्या आईकडून म्हणजेच स्नेहलता दीक्षित यांच्याकडूनच आलं होतं. माधुरीच्या आईला नृत्य करण्याची आवड होती मात्र त्या फार शिकू शकल्या नाहीत. त्यांनी हे स्वप्न मुलीमध्ये पाहिलं.
काही वर्षांपूर्वी टीव्हीवरील 'डान्स दिवाने' या डान्स रिअॅलिटी शो मध्ये माधुरी आईविषयी बोलताना भावूक झाली होती. ती म्हणाली, 'माझ्या आईचं डान्सर बनण्याचं स्वप्न होतं पण परिस्थितीमुळे ती ते पूर्ण करु शकली नाही. पण तिने तेच स्वप्न माझ्यात पाहिलं होतं. जेव्हा तिने मला नृत्य करताना पाहिलं तेव्हा तिला स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. तिला खूप आनंद झाला कारण तीचं स्वप्न मी जगत होते. मुलांसाठी आई स्वत:च्या इच्छांकडे लक्षच देत नाही आणि केवळ कुटुंबासाठी जगते.'
माधुरीची आई स्नेहलता दीक्षित या ९० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज सकाळी ८.४० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.