बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्या आईचं निधन झालं आहे. स्नेहलता दीक्षित यांनी राहत्या घरी अखरेचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होती. अखेर रविवारी सकाळी ८.४० मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली. माधुरीने एक पोस्ट शेअर करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. तसंच त्यांच्यावर अंत्यसंस्कार कधी करण्यात येणार हेदेखील सांगितलं आहे.
"आमची प्रेमळ आई स्नेहलता दीक्षित या आज सकाळी आपल्या प्रियजनांना सोडून निघून गेल्या. दुपारी ३ वाजता डॉ. इ. मुसा रोड, जीजामाता नगर वरळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत", अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या सासूंसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. सोशल मीडियावर त्यांनी कपांचे दोन फोटो शेअर केले होते. सोबत या कपांवर केलेली पेंटिंग आमच्या सासूबाईंनी केल्याचं आवर्जुन सांगितलं होतं. ‘माझ्या 90 वर्षीय सासूंनी केलेली ही पेंटिंग. त्यांना मॅक्युलर डिजनरेशन असून त्या नीट पाहूसुद्धा शकत नाहीत. मात्र त्यांच्या मनातून जे बाहेर येतं ते उल्लेखनीय आहे. ती जगातील सर्वांत सुंदर आणि सकारात्मक व्यक्ती आहे. तिच्या प्रतिभेची आठवण म्हणून आम्ही तिचे पेटिंग कपवर छापून घेतले आहेत,’ असं श्रीराम नेने यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं होतं. तर, माधुरीदेखील अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये आपल्या आईचा आवर्जुन उल्लेख करायची.
दरम्यान, आज दुपारी ३ वाजता वरळी येथे स्नेहलता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात माधुरी दीक्षित, भारती आडकर, रुपा दांडेकर या तीन मुली आणि अजीत दीक्षित हा मुलगा असा परिवार आहे. स्नेहलता यांचा जन्म १९३२ मध्ये झाला होता.त्यांचं लग्न शंकर दीक्षित यांच्यासोबत झालं होतं. परंतु, २०१३ मध्ये शंकर दीक्षित म्हणजे माधुरीच्या वडिलांचंही निधन झालं. त्यामुळे आता माधुरीच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं आहे.