बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ). या ‘मोहिनी’च्या हास्याने सर्वांनाच वेड लावलं. 16-17 वर्षांची असताना माधुरीला तिचा पहिला चित्रपट मिळाला. चित्रपटाचं नाव होतं ‘अबोध’. पहिला सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर तिने आणखी चारदोन सिनेमे केलेत. ते सुद्धा आपटले. पण सुभाष घई यांनी तिला संधी दिली आणि बॉलिवूडला ‘धकधक गर्ल’ मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात यामागे मोठा संघर्ष होता. इतक्या वर्षात पहिल्यांदा माधुरी या स्ट्रगलबद्दल बोलली. करिअरच्या सुरुवातीला या ‘धकधक गर्ल’लाही लोकांचे टोमणे, टीका सहन करावी लागली.
आरजे सिद्धार्थ काननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधुरीने त्या दिवसाच्या काही कटू आठवणी सांगितल्या. लोक तिच्या लूकची कशी खिल्ली उडवायचे, तिला कसे टोमणे मारायचे, हे तिने सांगितलं.
आणि लोकांची भाषा बदलली...याआधी ‘द अनुपम खेर’ या शोमध्येही माधुरीने करिअरच्या सुरूवातीला तिला सहन कराव्या लागलेल्या टीकेबद्दल बोलली होती. ‘माझे दोन सिनेमे फ्लॉप झाले होते आणि लोकांच्या निगेटीव्ह कमेंट्स मला ऐकू येत होत्या. अगदी मी हिरोईन मटेरियल नाही, मी खूप सडपातळ आहे, असे लोक म्हणत होते. मी ते ऐकून निराश झाले होते. पण तेजाब हिट झाला आणि सगळं काही बदललं. लोकांची भाषा बदलली. आधी मी त्यांना सडपातळ दिसायची, तेजाब हिट झाल्यावर तेच लोक मला स्लीम म्हणू लागले. अरे ही खूप चांगलं काम करते, जबरदस्त डान्स करते, अशा शब्दांत लोक माझं कौतुक करू लागले, असं ती म्हणाली होती.
माधुरी दीक्षितने 1984 मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने माधुरीला खरी ओळख दिली. यानंतर माधुरीने साजन, दिल तेरा आशिक, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.