९० च्या दशकात अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) . हम आपके है कौन, साजन, दिल तो पागल है, देवदास अशा कितीतरी चित्रपटांमध्ये माधुरीने काम केलं आहे. त्यामुळे आज माधुरी लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानी असल्याचं पाहायला मिळतं. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर माधुरी ओटीटीवर पदार्पण करत आहे. माधुरीची 'द फेम गेम' (The Fame Game) ही सीरिज अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या ती या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने माधुरीने अलिकडेच एक मुलाखत दिली. तिची ही मुलाखत सध्या चर्चेत आली आहे.
माधुरीने 'द फेम गेम' (The Fame Game) च्या प्रमोशनदरम्यान, अमेरिकेमधील वातावरण आणि देशातील वातावरण यांच्यात तुलना केली. यावेळी बोलत असताना अमेरिकेत जास्त स्वातंत्र्य होतं असं ती म्हणाली आहे. तिचं हे वाक्य ऐकल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाली माधुरी?
माधुरीने 'बाझार मॅगझीन'ला मुलाखत दिली आहे. यात तिने दोन देशांमधील फरकावर भाष्य केलं आहे. "सतत मुलांची काळजी घेणाऱ्या एका प्रोटेक्टिव्ह कुटुंबात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे माझे आई-वडील कामय माझ्यासोबत असायचे. यात मी शुटिंगला जातांनादेखील ते माझ्यासोबत असायचे. परंतु, माझं लग्न झाल्यानंतर माझे निर्णय मी स्वत: घेऊ लागले. अमेरिकेत राहायला गेल्यानंतर मी अनेक गोष्टी शिकल्या. भारतात असताना माझ्या आजुबाजूला सतत २० एक जणांनाचा घोळका असायचा. पण अमेरिकेत मी फार स्वच्छंदीपणे, स्वातंत्र्यात राहत होते", असं माधुरी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तिकडे सगळी कामं माझी मीच करायचे. मुलांना स्वत: शाळेतून घरी आणायचे. तसंच वेळ पडल्यावर माझी आई आणि सासू मला मदतही करायच्या. पण तुम्ही मोठे झाल्यावर बऱ्याच गोष्टी आपोआप शिकत असतात. अनुभवातून तुम्ही मोठे होत असता. मी देखील अशीच मॅच्युअर झाले. आजही मी कोणती भूमिका साकारायला घेतली तर ते अनुभव माझ्या पाठीशी असतात. ज्यातून मला ती भूमिका करणं सोपं जातं."
दरम्यान, माधुरीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. २००२ मध्ये माधुरीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर २००७ मध्ये तिने आ जा नचलेमधून कलाविश्वात कमबॅक केलं.