सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला लागला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काही अभिनेते देखील उतरले आहेत. उर्मिला मातोंडकर, प्रकाश राज यांसारखे कलाकार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्याशिवाय देखील बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असा तर्क गेल्या कित्येक दिवसांपासून लावण्यात येत होता. माधुरी निवडणूक लढणार अशा बातम्या देखील आल्या होत्या. पण माधुरी निवडणूक लढवणार नसून त्या केवळ अफवा असल्याचे तिनेच नुकतेच स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु माधुरीने ही गोष्ट पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे. मी कोणत्याही पक्षाचा भाग नाहीये असे म्हणत तिने सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने ‘आयएएनएस’शी बोलताना सांगितले आहे की, मी एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असून मी त्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण मी कोणतीही निवडणूक लढवत नाहीये. मी यापूर्वी देखील माझे मत व्यक्त केले होते. केवळ माझ्याच बाबतीत नव्हे तर अन्य बॉलिवूड कलाकारांबद्दल देखील अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मला राजकाणापेक्षा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मी राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाहीये.
माधुरीने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. हम आपके है कौन, बेटा, दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटांसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिचा टोटल धमाल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले आणि आता करण जोहरच्या कलंक या मल्टीस्टारर चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.