Join us

धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणते, ही निव्वळ अफवा

By तेजल गावडे | Published: June 03, 2019 8:00 AM

माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

 

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात  एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. त्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

- तेजल गावडे

डान्स दीवाने या डान्स रिएलिटी शोबद्दल थोडक्यात सांग?स्वतः डान्सची खूप दीवानी आहे. त्यामुळे माझ्यासाठी 'डान्स दीवाने' हा शो खूप खास आहे. या शोच्या पहिल्या सीझनमुळे दुसऱ्या सीझनमधील टॅलेंट पाहण्यासाठी खूप प्रेरीत व उत्सुक केले आहे. दुसऱ्यांदा परिक्षक बनले याचा मला खूप आनंद आहे. डान्स करण्यासाठी वयाला मर्यादा नसते, हे सिद्ध करणारा हा शो मला नेहमीच प्रेरीत करतो. यात तीन वेगवेगळ्या पिढ्यांना एकत्र डान्स करताना पाहणे खुप कमालीचे ठरणार आहे. 

यावेळेस तू रिएलिटी शोमध्ये शिट्टी वाजवण्याऐवजी झिंगाट करणार आहेस का?हो. आतापर्यंत मी चांगल्या परफॉर्मन्सवर शिट्टी वाजवत होते. पण, आधीच्या पहिल्या सीझनमध्ये एक- दोनदा डान्सदेखील केला होता. पण, मला वाटले की काहीतरी स्पर्धकांनी कमाल केली आहे तर परीक्षकांनी देखील मंचावर येऊन सेलिब्रेशन केले पाहिजे. त्यामुळे ही झिंगाट करण्याची कल्पना सुचली.

वेगवेगळ्या वयातील स्पर्धकांचे परीक्षण करणे किती चॅलेंजिंग वाटते?डान्स हा डान्स असतो. त्यामुळे त्याला कोणतीही मर्यादा नसते. कोणत्याही वयातील व्यक्ती डान्स करू शकतो. डान्सरला डान्स करताना पाहते की त्याची बॉडी मुव्हमेंट कशी आहे, त्याचे हावभाव कसे आहेत. तर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. त्याला मी कोणत्या नियमात पडताळणी करू शकत नाही. एकाच गाण्यावर वेगवेगळे लोक डान्स करतात तेव्हा ते वेगळेच वाटते.

तुम्ही स्वतःच्या कामाचे परीक्षण कशा प्रकारे करता?जेव्हा पहिल्यांदा स्वतःचा चित्रपट पाहत असते तेव्हा फक्त स्वतःलाच पाहत असतो. तेव्हा चित्रपट पहायला मजा येत नाही. दुसऱ्यांदा चित्रपट पाहते तेव्हा मज्जा येते कारण तेव्हा मी खऱ्या अर्थाने चित्रपट पाहत असते. समीक्षकाच्या दृष्टीकोनातून स्वतःचा सिनेमा पहावा लागतो. मी माझ्या कामाचे परीक्षण थोडेफार अशाच पद्धतीने करते.

सध्याच्या बॉलिवूडमधील चित्रपटांविषयी तुझे काय मत आहे?कथा, सादर करण्याची पद्धत, ज्या पद्धतीने सिनेमे बनत आहेत, नायिकांसाठी चांगले पात्र लिहिले जात आहेत. चित्रपटसृष्टीतील हा अभिनेत्रींसाठी खूप चांगला काळ आहे. तसेच चित्रपटांसाठीदेखील हा चांगला काळ आहे. कारण खूप चांगले सिनेमे बनत आहेत आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मग तो ऐतिहासिक सिनेमा असो किंवा छोट्या शहरावर आधारीत किंवा वेगळ्या विषयावर आधारीत चित्रपटांना प्रेक्षक स्वीकारत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. 

 तुझ्यावर बायोपिक बनतो आहे का?ही निव्वळ अफवा आहे. याची सुरूवात कुठून झाली हेदेखील मला माहित नाही. आता माझ्यावर बायोपिक बनवण्यासाठी ही योग्य वेळ नाही. मला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.

टॅग्स :माधुरी दिक्षितकलर्स