बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणजे माधुरी दिक्षित (madhuri dixit). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर माधुरी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. विशेष म्हणजे तिच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. मात्र, तिच्या मुलांनी तिच्या अभिनयाविषयी दिलेली प्रतिक्रिया थक्क करणारी होती. एका मुलाखतीत माधुरीने तिच्या मुलांना आपल्या अभिनयाविषयी काय वाटतं हे सांगितलं.
माधुरीने अनुपम खेर यांच्या एका कार्यक्रमात तिच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं होतं. यात आपला 'कोयला' चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याच मुलांनी आपली खिल्ली उडवल्याचं तिने सांगितलं. इतकंच नाही तर मुलाने केलेली कमेंट आजही मी विसरु शकले नाही असंही तिने यावेळी सांगितलं.
"माझ्या मुलाने कोयला चित्रपटातलं 'बम चिकी चिकी' हे गाणं पाहिलं आणि त्यानंतर एक नोट लिहून ती कम्प्युटरवर चिटकवून ठेवली. मी घरी आल्यावर ही नोट पाहिली, त्यावर, तू इतका विनोदी अभिनय कसा काय करु शकतेस? असं त्याने लिहिलं होतं. त्याची ही कमेंट मी आजपर्यंत विसरु शकले नाही", असं माधुरी म्हणाली.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाविषयीदेखील भाष्य केलं. "ज्यावेळी मला एखादा व्यक्ती पसंत पडेल त्याचवेळी फारसा विचार न करता त्याच्यासोबत संसार थाटायचा असं मी ठरवलं होतं. त्यामुळे नेनेंना भेटल्यानंतर मी कोणताही विचार न करता लग्न केलं आणि विदेशात स्थायिक झाले."