बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट ‘अबोध’चे नायक तापस पॉल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. बंगाली चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार अशीही त्यांची ओळख होती.तापस अनेक दिवसांपासून हृदयासंबंधित आजाराने पीडित होते. गत दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापस आपल्या मुलीला भेटायला मुंबईला गेले होते.
कोलकात्याला परतताना मुंबई विमानतळावर त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. यानंतर त्यांना जुहूच्या एका रूग्णालयात हलवण्यात आले. येथे आज पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज मंगळवारी संध्याकाळी कोलकात्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 2014 मध्ये तृणमूल काँगे्रसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पश्चिम बंगालच्या कृष्णनगर सीटवरून निवडणूक जिंकत ते लोकसभेत पोहोचले होते.
तापस पॉल यांचा जन्म 20 सप्टेंबर 1958 रोजी झाला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी अभिनयाची कारकिर्द सुरु केली. 1980 सालचा ‘दादा किर्ती’ त्यांचा पहिला बंगाली सिनेमा. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तापस की साहेब, प्रभात प्रिया, भालोबासा-भालोबासा, अनुरागेर छोआं, आमार बॉन्धोन अशा हिट सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.बंगाली सिनेमांशिवाय त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केले. ‘अबोध’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा त्यांचा पहिला सिनेमा. यात माधुरी दीक्षित त्यांची नायिका होती. माधुरीचाही हा पहिला सिनेमा होता.
रोज व्हॅली चिट फंडमध्ये आले होते नाव2016 साली तापस पॉल यांना अटक करण्यात आली होती. रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्यात कथितरित्या सहभागी असल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. 13 महिन्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.