बॉलिवूडची ‘मोहिनी’, बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित... (Madhuri Dixit) या मराठमोळ्या चेहऱ्यानं असंख्य चाहत्यांना वेड लावलं. नव्वदीच्या दशकात जेव्हा हिरोच्या नावावर सिनेमे चालायचे, त्या काळात या मराठमोळ्या मुलीने आपल्या दमदार अभिनयानं आणि दिलखेचक अदांनी बॉक्स ऑफिसवर अशी काही जादू केली की, सगळेच थक्क झालेत. माधुरीची क्रेज आजही कमी झालेली नाही. तिने अफाट यश, प्रसिद्धी मिळवली. अर्थात इथपर्यंत पोहोचणं सोप्प नव्हतंच. सौंदर्याची खाण असलेल्या माधुरीला कुणी रिजेक्ट करेन, यावर विश्वास बसत नाही. पण तिला सुद्धा दूरदर्शनने रिजेक्ट केलं होतं. होय, याबद्दलचा एक किस्सा भारी इंटरेस्टिंग आहे.किस्सा आहे 1984 सालचा. माधुरी नवखी होती. संधीच्या शोधात होती. अशात तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेचे नाव होते ‘बॉम्बे मेरी है’.
माधुरी आणि तिच्यासोबत बेंजामिन गिलानी मालिकेत लीड रोलमध्ये होते. माधुरी एक गृहिणी असते आणि तिचा नवरा एक स्क्रिप्ट रायटर असतो. लग्नानंतर हे जोडपं एका चाळीत शिफ्ट होतं आणि बाईचा नवरा स्क्रिप्ट राईटर आहे हे कळताच, लोकांची त्याला भेटण्यासाठी झुंबड उडते. चित्रपटात हिरो कोण? असे एक ना अनेक भलते भलते प्रश्न घेऊन चाळीतील लोक या जोडप्याला हैराण करतात, अशी या मालिकेची ढोबळ कथा होती.
ही मालिका दूरदर्शनवर टेलिकास्ट होणार होती. मालिकेचे पायलट एपिसोडही बनून तयार होते. पण प्रत्यक्षात माधुरीची ही मालिका कधी टेलिकास्ट झालीच नाही. कारण काय तर दूरदर्शनने ही मालिकाच नाकारली.होय,शोच्या कास्टमध्ये काहीही दम नाही, नवख्या कलाकारांना कोण बघणार? असं म्हणून दूरदर्शनने ही मालिका नाकारली होती. साहजिकच या मालिकेतून डेब्यू करण्याचं माधुरीचं स्वप्नही भंगलं. अर्थात तात्पुरतंच. कारण पुढच्याच वर्षी म्हणजे 1985 साली माधुरीने टीव्हीवर डेब्यू केला. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘पेइंग गेस्ट’ या मालिकेत ती झळकली. या मालिकेत तिनं नीना नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. राजश्रीनेच माधुरीला चित्रपटातही संधी दिली. ज्या वर्षी दूरदर्शनने माधुरीला रिजेक्ट केलं होतं, त्याच वर्षी राजश्रीने माधुरीला ‘अबोध’ हा सिनेमा दिला.
‘अबोध’ या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. हा सिनेमा आपटला. यानंतरचे आणखी काही सिनेमेही आपटले. पण 1988 हे साल माधुरीच्या आयुष्याला नवं वळण देणारं ठरलं. 1988 साली आलेल्या ‘तेजाब’ या सिनेमानं कमाल केली. या सिनेमातून माधुरीनं असं काही कमबॅक केलं की, निर्माते यानंतर तिचे उंबरठे झिजवू लागलेत. यानंतर माधुरीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.