धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) यांचा 'दिल' (Dil) सिनेमा आठवत असेलच. 1990 साली आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. तसंच सिनेमातील माधुरी आमिरची जोडीही चाहत्यांना भलतीच आवडली होती. पण हे फक्त पडद्यावरच. पडद्यामागे मात्र यांचं एकमेकांशी अजिबातच पटत नव्हतं.
'दिल' ही एक कॉलेज लव्हस्टोरी होती. आमिर खानने राजू आणि माधुरीने मधू ही भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या सेटवर खरंतर धमाल असते पण मुख्य कलाकारांमध्येच भांडण झालं तर मात्र चित्र वेगळं दिसतं. सिनेमाच्या सेटवर आमिर खानने असं काही केलं होतं की माधुरी अक्षरश: हॉटस्टिक घेऊन मागे लागल्याचा किस्सा आहे.
काय होता तो किस्सा?
आमिर खान परफेक्शनिस्ट असला तरी तो तेवढाच खोडकरही आहे. आमिर खान प्रँक करण्यात पटाईत होता. त्याने सेटवर सगळ्यांना असं सांगितलं की तो हात पाहून भविष्य सांगू शकतो. तर सगळ्यांनी आमिरला हात दाखवला. माधुरीनेही हात पुढे केला. माधुरीचा हात पाहताना आमिर म्हणाला, 'तू खूप हळवी आहेस. समोरच्यावर सहज विश्वास ठेवतेस. म्हणूनच तुला लोक मूर्ख बनवू शकतात जसं मी आत्ता बनवलंय.' असं म्हणत तो चक्क तिच्या हातावर थुंकला.
आता असं केल्यावर कोणीही भडकेलच. आमिरची हीच चेष्टा माधुरीलाही आवडली नाही. तिने चक्क हॉकीस्टिक उचलली आणि ती आमिरच्या मागे धावली होती. माधुरीने स्वत: हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. दुसरीकडे सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर ही जोडी 'दिवाना मुझसा नही' सिनेमातही एकत्र दिसली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी होती.