माधुरी दीक्षित ह्या सिनेमात करणार मुजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:39 PM2018-08-25T16:39:51+5:302018-08-25T16:43:03+5:30
माधुरी दीक्षित 'कलंक' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती मुजरा करताना दिसणार आहे.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा काही महिन्यांपूर्वी 'बकेट लिस्ट' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून माधुरीने मराठी सिनेेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले. या चित्रपटानंतर आता ती 'कलंक' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती मुजरा करताना दिसणार आहे.
अभिषेक वर्मन यांच्या आगामी 'कलंक' चित्रपटासाठी माधुरी दीक्षित मुजरा नृत्य करणार आहे. माधुरीला मुजरा शिकवण्यासाठी सरोज खान आणि रेमो डिसुझा एकत्र येणार आहेत. पुढील महिन्यात या गाण्याची शूटिंग होणार आहे.सरोज खान हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्यांच्यासोबत रेमो डिसोजा काम करणार आहे. या निमित्ताने दोन मोठे नृत्य दिग्दर्शक पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
'तेजाब' सिनेमातील 'एक.. दो.. तीन...' , 'बेटा' चित्रपटातील 'धक-धक' व 'खलनायक' सिनेमातील 'चोली के पिछे क्या है' यांसारख्या अनेक गाण्यांवरील डान्स माधुरीला सरोज खान यांनी शिकवला आहे. ही जोडी आता चार वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे.
माधुरीने रेमो आणि सरोज खान यांच्यासोबत डान्सच्या सरावाला चार दिवसांपासून सुरुवातही केली आहे. सरोज म्हणाल्या, 'आम्ही डान्सच्या सरावाची सुरुवात चार दिवसांपूर्वीच केली आहे. मी रेमोसोबत या डान्ससाठी नृत्य दिग्दर्शन करत आहे. या गाण्यावरील डान्सही आधी ज्याप्रकारे माधुरीसोबत मी काम केला, त्या गाण्यांची आठवण करुन देईल.'
५,६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवसात डान्स शूट होईल, अशी माहिती सरोज खान यांनी दिली.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटात आलिया भट, वरुण धवन, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा आदी स्टार कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.