प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. देशभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत दर्शन घेत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
कुंभमेळ्यात सहभागी होत अनुपम खेर यांनी गंगेत स्नान केलं. गंगेत डुबकी मारतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ते म्हणतात, "महाकुंभमध्ये गंगास्नान केल्याने आयुष्य सफल झालं. गंगा, जमुना आणि सरस्वती यांचा संगम जिथे होते तिथे जाऊन आधी मंत्राचा जप केला. प्रार्थना करताना आपसुकच डोळ्यांतून पाणी आलं. योगायोग बघा...बरोबर एक वर्ष आधी आजच्याच दिवशी अयोध्यामध्ये प्राण प्रतिष्ठास्थापनेच्या वेळीही असंच झालं होतं. सनातन धर्म की जय!".
प्रयागराज येथे सुरू असलेल्या या महाकुंभमेळ्याचा योग १४४ वर्षांनी जुळून आला आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळणे भाग्याचे समजले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. ५ फेब्रुवारीला ते गंगास्नान करणार आहेत.