लॉकडाऊनच्या काळात प्रसारित 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिकांना प्रेक्षकांची पसंती लाभली. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेनेही लॉकडाऊन काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. तूर्तास महाभारतातील एक पात्र प्रचंड चर्चेत आहे. होय, आम्ही बोलतोय ते महाभारतात ‘कुंती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाजनीन हिच्याबद्दल. ‘महाभारत’ या मालिकेनंतर नाजनीन गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वातून गायब आहे. आज ती कुठे आहे, काय करते कुणालाही ठाऊक नाही. पण एकेकाळी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख होती.
70 ते 82 च्या दशकात नाजनीन ग्लॅमरस व बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाई. या काळात पडद्यावर बिकिनी घालून तिने खळबळ उडवून दिली होती. ‘चलते चलते’ यासिनेमात तिने बिकिनी घातली होती. तिच्या या बोल्ड अवताराची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती.नाजनीनला बॉलिवूडमध्ये ब्रेक कसा मिळाला तर एका पार्टीमुळे.
होय,एका पार्टीत तिची दिग्दर्शक सत्येन बोस यांच्या असिस्टंटची भेट झाली. यानंतर ‘सारेगामापा’ या सिनेमात नाजनीनला संधी मिळाली. 1972 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर ती अनेक सिनेमांमध्ये झळकली. अर्थात लीड अॅक्ट्रेस म्हणून तिच्या वाट्याला फार कमी भूमिका आल्यात.
बहुतांश सिनेमात अभिनेता व अभिनेत्रीच्या बहीणीचे रोलच तिला आॅफर झालेत. याचे दु:ख नाजनीनला होते. याचमुळे पुढे पुढे तिने अशा ऑफर थेटपणे धुडकावून लावल्या.1976 साली प्रदर्शित ‘चलते चलते’ या सिनेमात नाजनीनने अनेक बोल्ड सीन्स दिलेत. कारण मी केवळ बहिणीच्या रोलसाठी बनलेली नाही, हे तिला दाखवून द्यायचे होते. नाजनीनचा हा सिनेमा हिट झाला. पण त्याचे श्रेय मात्र अभिनेता विशाल आनंदला दिले गेले.
खरे तर नाजनीनला अभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनायचे होते. मात्र आईने याला विरोध केला. अशात सिनेमाची ऑफर आली आणि नाजनीनने यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अनेक दिग्दर्शकांना नाजनीनमध्ये जया बच्चन दिसायची. नाजनीन जया बच्चनसारखी दिसते म्हणून काही सिनेमात तिला जया बच्चनच्या बहिणीची भूमिका मिळाली.
करिअरच्या एका टप्प्यावर नाजनीनने काही बी ग्रेड सिनेमातही काम केले. आपल्या करिअरमध्ये तिने केवळ 22 सिनेमे केलेत. पंडित और पठान, हैवान, कोरा कागज, फौजी, निर्दोष, दोन उस्ताद, खुदा कसम, वक्त की दीवार, बिन फेरे हम तेरे, ओ बेवफा असे अनेक सिनेमे तिच्या नावावर आहेत.