'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान' व 'सोनचिरैया' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने महाराष्ट्र दिना निमित्ताने केलेली ही बातचीत...
: तू महाराष्ट्रीयन असल्याचा तूला अभिमान वाटतो का?- हो. नक्कीच मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्राच्या भूमीत शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे दिग्गज व्यक्तींचा जन्म झाला आहे. या व्यक्तींमुळे आपल्याला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो. या व्यक्तींचा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा आहे. संस्कृती आधुनिक कल्पना आणि समाजाची जाण याच्यावर आधारलेली आहे.
: महाराष्ट्रात लोक शिवाजी महाराज यांना आपले दैवत मानतात. त्यांच्या काळातील गड, किल्ल्यांचे जतन करण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, असे तुला वाटते?- शिवाजी महाराजांच्या काळातील गड, किल्ले पूर्वजांनी बांधलेल्या अनोख्या वास्तू आहेत. त्यामुळे त्याचे जतन व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. या वास्तू महाराष्ट्राची शान व पर्यटन स्थळ आहे. जर आपण इंग्लडमधील किल्ले पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी तिथल्या किल्ल्यांचे फक्त संरक्षणच केले नाही तर पर्यटन स्थळ म्हणून सक्षम केले आहे. त्यामुळे लोकांना नोकऱ्या व उपजीविकेचे साधन मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर योद्धा, रणनितीकार व नेते होते. त्यामुळे त्यांच्या लढाईंचे व इतिहासातील साक्षीदार हे किल्ले आहेत. या किल्ल्यांमुळे तिथे घडलेल्या घटना व कथा आपल्यापर्यंत पोहचू शकल्या. सरकारने गड, किल्ल्यांच्या संरक्षणासाठी नेमलेले अधिकारी त्यांचे काम करीत आहेत. पण, महाराष्ट्रातल्या लोकांनीदेखील ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व जतन केले पाहिजे.
: मराठी लोकांची वैशिष्ट्ये काय सांगशील?- प्रत्येक जणांचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्रीयन लोक दुसऱ्यांचा आदर करणे आणि सर्वांनी एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करतो.
: तुला महाराष्ट्रीयन कोणते खाद्य आवडते आणि तुला बनवायला आवडते?- मला पुरणपोळी खूप आवडते. प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवली जाते. मी स्वयंपाक नाही करत कारण माझी आई खूप छान स्वयंपाक बनवते.
: तुला मराठी चित्रपटांबद्दल काय वाटते आणि तुझा आवडता चित्रपट कोणता?- मराठी चित्रपटात विविध मुद्दे व विषय हाताळले जातात तर हिंदी चित्रपटांत फार क्वचितच असे पाहायला मिळते. देऊळ चित्रपटात लोकांचा भाबडा अंधविश्वास दाखवला होता. नटरंग चित्रपटातून लैंगिकतेवर आणि सैराट चित्रपटात जातीभेदावर भाष्य करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन लोक अशा संवेदनशील मुद्द्यांचा खूप आदर करतात, हे या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईतून दिसून येते. भारताला अभिमान वाटेल अशा चित्रपटांची निर्मिती करीत राहू, अशी मला खात्री आहे.