आयुषमान खुराणा व अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला़. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित मीम्सही व्हायरल झालेत. महाराष्ट्र पोलिसांनी असेच एक मीम शेअर केले आणि आयुषमानने त्याला मराठीतून रिप्लाय दिला.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या या काळात नागरिकांना सतत घरात राहण्याचे, विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले जातेय. मात्र तरीदेखील काही जण विनाकारण मोकाट फिरताना दिसत आहेत. अशात मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. याच जनजागृतीअंतर्गत महाराष्ट्र पोलिसांनी एक हटके ट्विट केले शिवाय यात ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमाच्या टॅग लाइनचा हटके वापर केला. मग काय या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
‘घर तुमचं, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची ‘परमिसन’ आमची घ्यावी लागेल. तुमच्याच सुरक्षेसाठी.कोरोनाव्हायरस पासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वत:ची ‘हवेली’. विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा,’असे महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले. हे ट्विट पाहिल्यानंतर अभिनेता आयुषमान खुरानाने मराठीमध्ये रिप्लाय दिला़.‘अगदी बरोबऱ़़ घरात सुरक्षित, बाहेर सध्या नाही,’ असे आयुषमानने लिहिले.
‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने मेकर्सनी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. येत्या 12 जूनला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय.