मुंबईवर झालेल्या २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष उलटून गेली आहेत. या हल्ल्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी आजही या हल्ल्याची आठवण आल्यास शरीरावर काटा येतो. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले होते. तसेच १४ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली होती. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्ण यांना यात वीरमरण आले होते.
या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करतांना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर २६/११ चा हिरो अशी त्यांची स्वतंत्र ओळखही निर्माण झाली होती. याच संदीप यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट येत असून या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट बनवला जाणार आहे.
संदीप उन्नीकृष्ण यांच्यावर आधारित लवकरच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे नाव मेजर असे आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. मेजर ही त्यांची पदवी असल्याने या चित्रपटाचे नाव देखील तेच ठेवण्यात येणार आहे. अभिनेता अदिवी सेश हा या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या जीएमबी इन्टरटेंन्मेंट या निर्मिती संस्थेमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करणार आहेत. महेश बाबूनेच ट्वीट करून या चित्रपटाबाबत सगळ्यांना सांगितले आहे. महेश बाबूसोबतच या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे. कोणत्याही तेलुगू चित्रपटाची निर्मिती करण्याची सोनी पिक्चर्सची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अदिवी सेश याने यापूर्वी ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये काम केले होते.