Krishna Ghattamaneni Passed Away : एक काळ गाजवणारे साऊथचे सुपरस्टार व अभिनेता महेश बाबूचे (Mahesh Babu) वडील कृष्णा आज या जगात नाहीत. काल 15 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. पित्याच्या निधनानं महेश बाबू खचला आहे. या वर्षभरात महेश बाबूने आपल्या कुटुंबातील तीन जवळच्या लोकांना गमावलं.
याचवर्षी 8 जानेवारीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. दीडच महिन्याआधी महेश बाबूची आई इंदिरा देवी हे जग सोडून गेली आणि आता पाठोपाठ त्याच्या वडिलांनीही या जगाचा निरोप घेतला. यामुळे महेश बाबू कोलमडला आहे. एकापाठोपाठ एक आघात सोसणारा महेश बाबू काल वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी (Krishna Garu Funeral) कोलमडला. त्याला अश्रू अनावर झालेत.
याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत महेश बाबू रडताना दिसतोय. सांत्वन करण्यासाठी आलेल्यांसमोर त्याला अश्रू आवरता आले नाहीत आणि तो सगळ्यांसमोर रडू लागला. अर्थात पुढच्याक्षणी त्याने स्वत:ला सावरलं. हा व्हिडीओ पाहून महेश बाबूचे चाहतेही भावुक झालेत. अनेकांनी त्याचं सांत्वन केलं आहे. महेश बाबू खचू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशा शब्दांत अनेक चाहत्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
28 सप्टेंबर 2022 रोजी महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं. महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोनदा लग्न केलं होतं. इंदिरा देवी यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री निर्मलाशी लग्न केलं. घटस्फोटानंतर इंदिरा देवी एकट्याच राहत होत्या. महेश बाबू त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आईला भेटायला जात असत.
त्याआधी 8 जानेवारी रोजी महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू जग सोडून गेला होता. भावाच्या निधनाच्या वेळी महेश बाबूला कोरोनाची लागण झाली होती. भावासाठी त्यांनी भावूक पोस्टसुद्धा लिहिली होती. भावाला आणि आईच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर येण्याआधीच महेश बाबूवर पुन्हा एकदा मोठा आघात झाला. सोमवारी महेश बाबूचे वडील कृष्णा यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.