बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट यांचा आज वाढदिवस. महेश भट यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले. पण त्यांचे खरे आयुष्यही कमी फिल्मी नव्हते. नात्यांतील अनेक चढऊतार, अफेअर आणि अनेक वादांनी त्यांचे आयुष्य भरलेले आहे.
कॉलेजमध्ये असतानाच महेश भट प्रेमात पडले. लोरिएन ब्राईट नावाच्या तरूणीच्या ते प्रेमात पडले. लग्नानंतर महेश भट यांनी लोरिएनचे नाव बदलून किरण असे नवे नाव दिले. महेश व किरण यांना पूजा आणि राहुल अशी दोन मुले झालीत. पण 1970 मध्ये महेश भट अभिनेत्री परवीन बाबीच्या प्रेमात पडले.
महेश आणि परवीन बाबी यांच्या अफेअरची कधी नव्हे इतकी चर्चा झाली होती. पण परवीन बाबी यांच्या मानसिक आजाराने या नात्याचा अंत झाला. तो दिवस परवीन व महेश भट यांच्या नात्याचा शेवटचा दिवस ठरला.
त्या दिवशी असे काय झाले होते? याचा खुलासा महेश भट यांनी स्वत: एका मुलाखतीत केला होता. त्यांनी सांगितले होते की, ‘एक दिवस मी परवीनच्या घरी गेलो. फिल्मी कपड्यांमध्ये हातात चाकू घेऊन ती एका कोप-यात उभी होती. भीतीने अगदी थरथर कापत होते. यापूर्वी कधीही मी तिला अशा अवस्थेत बघितले नव्हते. ‘दरवाजा बंद कर दो महेश, वो हमें मारने आ रहे है, जल्दी दरवाजा बंद करो,’ असे म्हणून तिने मला आत घेतले. तिच्या या शब्दांसोबतच परवीनसोबतचे माझे नाते, प्रेम, सुख-दु:ख, पाप सगळे काही संपले. वेड आणि अंत दोन्ही मी उघड्या डोळ्यांनी बघत होतो. कारण मी जिच्यावर प्रेम करत होतो, ती संपली होती. तिच्यासोबत आमच्या नात्याचाही अंत झाला होता.’
परवीन बाबीचा आजार इतका बळावला होता की, त्या ठीक होण्याची शक्यता कमी होती. महेश भट यांनी मोठ्या डॉक्टरांकडे त्यांना उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी परवीन यांना इलेक्ट्रीक शॉक देण्याचे सुचवले. पण परवीनला इलेक्ट्रीक शॉक देण्याचा पर्याय महेश यांना मान्य नव्हता. लाख प्रयत्न करूनही परवीन यांचा आजार बरा झाला नाही आणि एकदिवस या आजाराने त्यांचा बळी घेतला.