बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट म्हणजे, आपल्या अटींवर आयुष्य जगणारा माणूस. आपल्या या स्वभावापोटी महेश भट्ट यांनी आजपर्यंत अनेक वाद ओढवून घेतले. पण त्यांनी आपला बाणा सोडला नाही. ही इतकी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, त्यांची ताजी मुलाखत. होय, हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. मी एका एकट्या मुस्लिम महिलेचा अनौरस मुलगा आहे. त्या महिलेचे नाव शिरीन मोहम्मद अली आहे, असे त्यांनी सांगितले.व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कसे पिता आहात, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर त्यांनी वरील खुलासा केला. बाप कसा असतो, मला ठाऊक नाही. कारण मी एका एकट्या मुस्लिम महिलेचा अनौरस मुलगा आहे. माझ्याकडे माझ्या वडिलांबद्दलची एकही आठवण नाही. त्यामुळे एक पिता कसा असायला हवा, मला ठाऊक नाही. माझे वडिल नानाभाई भट्ट असूनही नसल्यासारखेच होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या नावाचा अर्थ काय होतो, असे मी एकदा आईला विचारले होते. यावर मला माहित नाही. तुझे नाव तुझ्या वडिलांनी ठेवले होते. मी त्यांना विचाारून सांगते, असे ती मला म्हणाली. यानंतरच्या भेटीत तिने मला महेशचा अर्थ सांगितला. महेशचा अर्थ देवांचा देव असा होतो, असे तिने मला सांगितले. मी त्यावेळी खूप लहान होतो. मला माझे नाव मुळीच आवडायचे नाही. कारण भगवान महेश प्रचंड क्रोधी होते. माझे नाव महेशऐवजी गणेश असावे, असेच मला वाटत असे. भगवान गणेशांच्या पित्यासारखे माझे वडिलही अज्ञात होते. आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आणखी खुलासा करताना त्यांनी सांगितले की, माझा मुलगा राहुल ३ वर्षांचा असताना घर सोडून गेलो होता. मी एका अन्य स्त्रीसाठी घर सोडून जातोय, हे त्याला कळत होते. मी हे अमान्य करणार नाही. आम्हा बाप-लेकाचे नाते खराब होते. पण हे नाते कधी संपले नाही.
महेश भट्ट म्हणतात, मी एका एकट्या मुस्लिम महिलेचा अनौरस मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 7:14 PM