काही लोक गैरफायदा घेतात...! ओटीटी सेन्सॉरशिपवर बोलले महेश मांजरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 04:15 PM2021-02-21T16:15:43+5:302021-02-21T16:16:06+5:30
बॉलिवूडच्या अनेक कलाकार व दिग्दर्शकांचा ओटीटी सेन्सॉरशिपला विरोध आहे. आता दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनीही याबाबत या मुद्यावर आपले मत मांडले आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी की नाही, यावरून सुरु असलेला वाद तसा जुना. पण आता सरकार या मुद्यावर ठाम आहे आणि येत्या काळात ओटीटीवरील नियम आणखी कडक होणार आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकार व दिग्दर्शकांचा ओटीटी सेन्सॉरशिपला विरोध आहे. आता दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनीही याबाबत या मुद्यावर आपले मत मांडले आहे. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसावी, असे मत त्यांनी मांडले. पण सोबतच, मेकर्सनीही अनिर्बंध स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये, असेही त्यांनी म्हटलेय.
आएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ते ओटीटी सेन्सॉरशिपच्या मुद्यावर बोलले. ‘ व्यक्तिश: मी प्रेक्षकांना काय दाखवावे आणि काय नाही, याबाबत अगदी स्पष्ट आहे. मला तसे काळजी करण्याचे कारण नाही. कारण माझ्या सीरिज प्रेक्षक कुटुंबासोबत बसून पाहू शकतो. माझ्या मते, आपण प्रेक्षकांना काय दाखवतो, याबाबत मेकर्सनी सुद्धा जबाबदारीने विचार करायला हवा. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसावी, असे माझे स्पष्ट मत आहे. पण काही लोक अनिर्बंध स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात, हेही सत्य आहे,’असे ते म्हणाले.
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपटगृहांवर परिणाम होईल किंवा त्यांचे भविष्य धोक्यात येईल, याबद्दलही त्यांनी मत मांडले. चित्रपटगृहांना कोणीही रिप्लेस करू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले, ‘ओटीटीमुळे चित्रपटगृहांचे अस्तित्व धोक्यात येईल, ही भीती अवाजवी आहे. चित्रपटगृहांना कोणतेही माध्यम बंद पाडू शकत नाही. सुरुवातील टेलिव्हिजनची लोकप्रियता पाहूनही अशीच चर्चा झाली होती. पण ओटीटीमुळे चित्रपटगृहांवर काहीही परिणाम होणार नाही, याबद्दल चिंता करणे व्यर्थ आहे.’
येत्या 26 तारखेला डिज्नी प्लस हॉटस्टारवर महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेली ‘1962-द वॉर इन द हिल्स’ ही वेबसीरिज रिलीज होत आहे. या वेबसीरिजमधून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करतोय.