Join us

तू एकदा भेटच, तुझी खैर नाही...! महेश मांजरेकर भडकले, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:05 IST

ट्रोलरला दिली धमकी...

ठळक मुद्देतुला शोधण्यासाठी जगाच्या कोणत्याही कोप-यात जावे लागले तरी चालेल मी तुला शोधून काढणारच. हा माझा शब्द समज,’ असे महेश मांजरेकरांनी लिहिले.

कोरोना व्हायरसमुळे जगजीवन ठप्प झाले आहे. अख्या देश जणू घरात बंद आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र लोक कधीनव्हे इतके अ‍ॅक्टिव्ह दिसत आहेत. अशात सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सला जोर चढणार नसेल तर नवल. अगदी काहीही कारण नसताना ट्रोल करण्याचा प्रकारही यामुळे वाढला आहे. दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत असेच काही घडले. एका ट्रोलरने त्यांना नाहक ट्रोल केले. मग काय, महेश मांजरेकरांचा पारा असा काही चढला की, त्यांनी थेट या ट्रोलरला धमकीच देऊन टाकली.

होय, कोरोना संकटामुळे ऐरवी वाजत गाजत साजरा होणारा गुढीपाडवा यंदा अगदीच शांततेत साजरा झाला. सर्वांनी आपआपल्या घरी शांतपणे पाडवा साजरा केला. दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनीही अतिशय साध्या पद्धतीने पाडवा साजरा केला. या सेलिब्रेशनचा कुटुंबासोबतचा एक फोटो मांजरेकरांनी शेअर केला होता. सोबत चाहत्यांना पाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. ‘ आम्ही एकत्र आहोत. आज गुढीपाडवा, पण कोरोनावर विजय मिळवल्यावर आपण सर्व सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे करुया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवा,’ असा संदेश त्यांनी या पोस्टसोबत दिला होता.  या फोटोवर त्यांच्या सर्वच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र एक ट्रोलरने काहीही कारण नसताना यावर महेश मांजरेकरांना ट्रोल केले. केवळ इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ केली. मग काय, महेश मांजरेकरांचा पारा चढला.  त्यांनी या ट्रोल करणा-याला थेट धमकीच देऊन टाकली.

‘तू एकदा भेट, तुझी खैर नाही. तू कुठेही असला तरी मी तुला शोधून काढेल. कोरोनाचे हे संकट टळू दे, सगळे शांत होऊ दे. मग बघ. तुला शोधण्यासाठी जगाच्या कोणत्याही कोप-यात जावे लागले तरी चालेल मी तुला शोधून काढणारच. हा माझा शब्द समज,’ असे महेश मांजरेकरांनी यावर लिहिले.

टॅग्स :महेश मांजरेकर