कंगना राणौतच्या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत. आधीच कोर्टकचे-यांमध्ये अडकलेल्या कंगनाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. होय, गीतकार-लेखक जावेद अख्तर यांच्यानंतर आता पंजाबच्या भटिंडा येथील महिंदर कौर या आज्जीनेही कंगनावर मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणावर उद्या 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे.कंगनाने माझी तुलना अन्य एका महिलेसोबत करून माझ्यावर चुकीचे आरोप केले, असे या आजीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.कंगनाने याच आज्जीशी पंगा घेतला होता. शेतकरी आंदोलनादरम्यान या आजीवर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते.
दीड महिन्यांपूर्वी ही आजी शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनात झेंडा हाती घेतलेल्या या आजीचा फोटो शेअर करत, ‘अशा महिला 100 रूपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’ , असे ट्वीट कंगनाने केले होते.
कंगनाच्या या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या ट्वीटवर आक्षेप घेत कंगनावर टीका केली होती. खुद्द महिंदर कौर यांनीही एक व्हिडीओ शेअर करत कंगनाला फैलावर घेतले होते. ‘माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. 100 रूपयांसाठी मला कुठेही जाण्याची गरज नाही.पण कोरोनामुळे कंगनाकडे काम नसेल तर तिनेच माझ्या शेतात काम करायला यावे,’ असे महिंदर कौर नावाच्या या आजींनी कंगनाला सुनावले होते.