पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) भारतातही तितकीच लोकप्रिय आहे. तिला बॉलिवूडमध्ये थेट शाहरुख खानसोबत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. 'रईस' सिनेमात ती झळकली. माहिराची 'हमसफर' ही फवाद खानसोबतची पाकिस्तानी मालिका भारतातही खूप गाजली. बॉलिवू़ड पदार्पणावेळी माहिरा खानचेरणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) काही फोटो लीक झाले होते. ज्यामध्ये दोघंही धूम्रपान करताना दिसतात. या फोटोंमुळे चांगलीच खळबळ माजली होती. आता नुकतंच माहिराने ती घटना आठवत प्रतिक्रिया दिली आहे.
'बीबीसी एशियन नेटवर्क'सोबत बातचीत करताना माहिरा खानने सिनेसृष्टीतील संघर्ष, घटस्फोट, दुसरं लग्न आणि रणबीर कपूरसोबतचे ते फोटो या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. हे सांगताना ती म्हणाली की या प्रवासात मला चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला. घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी होती. कित्येक वर्ष एकटं राहणं, इंटरनेटवर फोटो व्हायरल होणं आणि दुसऱ्या देशात बॅन होणं हे सगळंच माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला एकटीलाच याच्याशी सामना करावा लागला होता. मी कोणासोबत काहीच शेअरही करु शकत नव्हते.
रणबीर कपूरसोबतच्या व्हायरल फोटोंवर माहिरा म्हणाली, "एका आर्टिकलमधून माझे फोटो समोर आळे ज्यात मी शॉर्ट व्हाईट ड्रेस घातला होता. तेव्हा मला वाटलं आता सगळं संपलं. त्या आर्टिकलमध्ये माझ्याबद्दल बरंच काही लिहिण्यात आलं होतं. नंतर इतर मीडियातही ते फोटो आले आणि इंटरनेटवर व्हायरल झाले. मी खूप घाबरले होते. मला वाटलं आता माझं करिअर संपलं. पण मी स्वत:चीच समजूत घातली. काही काळानंतर आपोआप हे थांबेल, लोक विसरुन जातील असं मी स्वत:ला समजावलं. मी काही काळ सर्वांपासून दूर गेले. जसा वेळ गेला तसं सगळं पुन्हा सुरळीत झालं."