Join us

सैफ अली खानवर हल्ला करणारा मुख्य आरोपी ताब्यात, छत्तीसगमध्ये ट्रेनमधून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:59 IST

Saif Ali Khan Update: सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.  शनिवारी दुर्ग येथे आरपीएफने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.  शनिवारी दुर्ग येथे आरपीएफने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला जीआरपी ठाण्यात नेण्यात आलं आहे. तिथे त्याची चौकशी करण्यात येईल. छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा जो फोटो मुंबई पोलिसांकडून देण्यात आला होता त्यातील व्यक्ती आणि रेल्वे स्टेशनवरून पकडण्यात आलेल्या आरोपीचा चेहरा मिळताजुळता आहे.

संभवत: सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा हाच मुख्य आरोपी असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ही मुंबई येथून दुर्ग येथे दुपारी दीड वाजता पोहोचली होती. त्यावेळी हा आरोपी जनरल डब्यात बसला होता. आता या आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस रात्री दुर्ग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील एका उच्चभ्रू वस्तीमधील इमारतीत असलेल्या घरात सैफ अली खानवर हल्ला झाला होता. सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीने सैफवर चाकूने सपासप वार केले होते. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालय दाखल करून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  

रुग्णालयातील डॉक्टरांनी सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, सैफ अली खानला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तो आता चालत फिरत आहे. तसेच पुढच्या तीन चार दिवसांत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.  

टॅग्स :सैफ अली खान मुंबईछत्तीसगड