26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीचे 51 जवान शहिद झालेत. यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचाही समावेश होता. त्यांच्या या अभूतपूर्व बलिदानाची कथा सांगणारा ‘मेजर’ (Major) हा सिनेमा आज रिलीज झाला. एका रिअल लाईफ हिरोच्या आयुष्यावरच्या या सिनेमाचं जबरदस्त कौतुक होतंय. साऊथ सुपरस्टार अदिवि शेष (Adivi Sesh) याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिला आणि संदीप उन्नीकृष्णन यांच्या माता-पित्याला अश्रू अनावर झालेत.
आज बेंगळुरूच्या एका चित्रपटगृहात संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-बाबानं हा चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यानंतर ते दोघंही चित्रपटगृहाबाहेर पडले ते डबडबलेल्या डोळ्यांनी. पडद्यावर लेकाची भूमिका साकारणारा अभिनेता अदिवि शेष याला त्यांनी कडकडून मिठी मारली. आईने भावुक होत अदिविला प्रेमानं जवळ घेतलं. हा क्षण सर्वांनाच भावुक करणारा ठरला. अदिविने या भावुक क्षणाचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पहिल्या फोटोत संदीप उन्नीकृष्णन याच्या वडिलांनी अदिविचा हात पकडलेला दिसतोय. दुस-या फोटोत मेजर संदीप यांची आई अदिविला कडकडून मिठी मारताना दिसतेय. संदीप उन्नीकृष्णन यांचे वडील के. उन्नीकृष्णन यांनी चित्रपटाचं मनापासून कौतुक केलं. ‘आम्ही जे पाहिलं, जे भोगलं, तेच चित्रपटात दाखवलं गेलं आहे. या चित्रपटानं आमच्या सगळ्या वाईट आठवणी पुसून काढल्या. इतका नितांत सुंदर सिनेमा बनवल्याबद्दल मी मेजरच्या अख्ख्या टीमचे आभार मानतो,’असं ते म्हणाले.
मेजर संदीप यांना बालपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. परंतु, एक सैनिक, जवान होणं वाटतं तितकं सोपं नाही. या क्षेत्रात अनेक अडचणी आणि प्राणांची आहुती द्यावी लागते हे त्यांच्या आई-वडिलांना माहित होतं. त्यामुळे मुलाचा हा निर्णय त्यांना मान्य नव्हता. मात्र, देशप्रेमाने भारावून गेलेल्या संदीप यांनी सैन्याशिवाय अन्य कोणतंही क्षेत्र मान्य नव्हतं. त्यामुळे आई-वडिलांचं न ऐकता ते सैन्यात भरती झाले होते. परंतु, सैन्यात भरती होऊन त्यांनी वेळोवेळी त्यांचं देशप्रेम दाखवून दिलं. 26/11 च्या वेळी मोठ्या चतुराईने मेजर संदीप ताज हॉटेलमध्ये शिरले आणि हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुपपणे सुटका केली होती.