राजकुमार हिरानी (rajkumar hirani)यांचा मुन्नाभाई 'MBBS' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. संजय दत्त (sanjay dutta) आणि अर्शद वारसी (arshad warsi) यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. या सिनेमाचा प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडला की खऱ्या आयुष्यातही लोक संजय आणि अर्शदला मुन्नाभाई आणि सर्किट याच नावाने हाक मारु लागले. उत्तम अभिनय करत या दोघांनीही त्यांच्या भूमिका जीवंत केल्या. त्यामुळेच हा सिनेमा आणि त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. परंतु, या सिनेमासाठी अर्शद आणि संजय दत्त निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते.
संजय आणि अर्शद यांचा हा सिनेमा तुफान गाजला. त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांनी उचलून घेतल्या. परंतु, या दोन्ही भूमिकांसाठी हे कलाकार निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. त्यांच्या ऐवजी निर्मात्यांनी शाहरुख खान (shahrukh khan) आणि मकरंद देशपांडे यांची निवड केली होती. या सिनेमात मकरंद देशपांडे (makarand deshpande) सर्किटची भूमिका साकारणार होते. अलिकडेच मकरंद देशपांडे यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी खुलासा केला. सोबतच सर्किटची भूमिका नाकारण्यामागचं कारणही सांगितलं.
"राजूने (राजकुमार हिरानी) मला फोन केला होता. मी या सिनेमातील काही भागांचं शुटिंगही केलं होतं. मी माझ्या आवाजातलं एक गाणं सुद्धा रेकॉर्ड केलं होतं. या सिनेमात मी सर्किट आणि शाहरुख खान मुन्नाभाईची भूमिका साकारणार होतो. पण, खांद्याला दुखापत झाल्यामुळे शाहरुख ही भूमिका करु शकला नाही. आणि, त्याच्याऐवजी संजय दत्तची एन्ट्री झाली", असं मकरंद देशपांडे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "ज्यावेळी मेकर्स डेट द्यायचे त्यावेळी मला खूप टेन्शन यायचं. ज्यावेळी सिनेमाच्या डेट्स आल्या त्यावेळी राजूने मला ५६ दिवस शूटसाठी लागतील असं सांगितलं. पण, माझ्यासाठी ते गैरसोयीचं होतं.कारण, त्यावेळी मी स्वत: एक सिनेमा करायच्या विचारात होतो. माझ्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे त्यामुळे मग कोण मला रोल ऑफर करतोय, कोणत्या प्रकारचा रोल आहे, त्यामुळे मला कसा फायदा होईल, यश-अपयश मिळे की नाही याचा मी काही विचार करत नाही."
दरम्यान, सिनेमाला देण्यासाठी वेळ नसल्यामुळे मकरंद देशपांडे यांनी सर्किटची भूमिका नाकारली. अलिकडेच ते देव पटेलच्या मंकी मॅन या सिनेमात झळकले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत सिकंदर खेर, शोभिता धुलिपाल यांनी स्क्रीन शेअर केली आहे.