मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या नात्याची नेहमीच चर्चा असते. अर्जुन मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. वयातील अंतरामुळे कपल अनेकदा ट्रोल झालं आहे. पण तरी त्यांनी सर्व झुगारुन एकमेकांवर प्रेम केलं. 'छान जोडी' असं म्हणत काही वेळेस त्यांचं कौतुकही झालं. पण आता त्यांच्यात दुरावा आला असून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे अशी चर्चा आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार दोघांचं ब्रेकअप झालं आहे.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, अनेक सूत्रांच्या माहितीप्रमाणे मलायका अर्जुन वेगळे झाले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, 'मलायका आणि अर्जुन यांच्यात सुंदर नातं होतं. यापुढेही दोघांच्या मनात एकमेकांबद्दल स्थान असेल. पण आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि एकमेकांच्या आदरार्थ त्यांनी याबाबत मौन पाळलं आहे. त्यांनी कोणालाही यात ओढून नातं तोडण्याची संधी दिली नाही. त्यांच्यात दीर्घ, प्रेमळ आणि फ्रुटफूल नातं होतं जे आता दुर्देवाने राहिलं नाही. पण याचा अर्थ त्यांच्यात एकमेकांविषयी राग आहे असा होत नाही. दोघंही एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांसाठी कायम ठामपणे उभे राहतील."
"गेल्या काही वर्षांपासून दोघांनी या नात्यात आदर राखला. यापुढेही राखतील. त्यांच्यात अतिशय सीरियस नातं होतं त्यामुळे आता या हळव्या क्षणी लोकांनी त्यांना स्पेस द्यावी अशी त्यांची इच्छा आहे."
2018 पासून अर्जुन आणि मलायकाच्या लव्हस्टोरीची चर्चा होती. तेव्हा पहिल्यांदा दोघांनी एकत्र इव्हेंटला हजेरी लावली होती. नंतर मलायकाच्या 45व्या वाढदिवशी त्यांनी एकत्र फोटो पोस्ट करत नातं जाहीर केलं होतं. मालदीव्ह्जमधील त्यांच्या व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी मलायकाने लेकाच्या पॉडकास्टमध्ये मात्र अर्जुनविषयी काहीही सांगितले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून दोघं एकत्रही दिसले नाहीत. त्यामुळे या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते मात्र नक्कीच दुखावले आहेत.