बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टॅग केलं आहे. सोबतच तिचा संतापही व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका श्वानाचा आणि त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ठाण्यातील एका पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यातील असून दोन व्यक्ती एका पाळीव श्वानाला निदर्यीपणे मारत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यात मलायकानेही तिचा राग व्यक्त केला.
काय आहे मलायकाची पोस्ट?
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती श्वानाला मारत आहे. तर,पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेत आहेत. मला आशा आहे की तो गरीब असहाय्य श्वान ठीक असेल. हा व्हिडीओ पाहून मला प्रचंड राग आला. पण, मला विश्वास आहे की या प्रकरणाची कारवाई करण्यात आली असेल. मात्र, त्या व्यक्तींना कठोर शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असं कॅप्शन देत मलायकाने तिचा संताप व्यक्त केला आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांना टॅगही केलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कारवाईची मागणी केली. अभिनेता रितेश देशमुख यानेही हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर PAWS चे पदाधिकारी, नीलेश भांगे आणि इतर काही जणांनी तक्रार दाखल केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.