Malaika Arora Father Death : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. अनिल अरोरा यांनी एवढं मोठं टोकाचे पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे.
मलायका आणि तिच्या वडिलांमध्ये घट्ट नातं होतं. मलायकाला ते कायम पाठींबा देत आले. मलायकाचे आई आणि वडील यांचा घटस्फोट झालेला असला तरी त्यांनी मिळून मलायका आणि तिची बहिण अमृता यांचं पालकत्व निभावलं. मलायकाने अनेकदा तिच्या कुटुंबासोबते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वडिलांच्या अशा जाण्याने मलायकाला मोठा धक्का बसला आहे. मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली, तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली आहे. या कठीण काळात मलायकाचा पूर्वपती अरबाज खान हा अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे.
मलायकाचे वडील अनिल अरोरा मर्चंट यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केलं होतं. अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. पंजाबी असलेल्या अनिल यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केलं होतं. दोघांना मलायका आणि अमृता या दोन मुली झाल्या. पण, काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. मलाकाचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. मलायकाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, "माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात".
आई-वडिलांच्या घटस्फोटातून धडा मिळाल्याचं मलयाकाने मुलाखतीत सांगितलं होतं. ती म्हणाली होती, "ते विभक्त झाल्यानंतर आईला एका नव्या आणि अनोख्या दृष्टीकोनातून पाहता आलं. पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी जे काही करावं लागतं ते शिकले. तेच धडे जीवनाचा आणि प्रवासाचा आधार आहेत. मी अजूनही पूर्णपणे स्वतंत्र आहे. मी माझ्या स्वातंत्र्याची कदर करते आणि माझ्या स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते".
अनिल आणि जॉयस पॉलीकार्प यांची मुलगी मलायकाने अरबाज खानशी लग्न केलं होत. पण तीचाही घटस्फोट झाला. अरबाज आणि मलायका यांना अरहान नावाचा एक मुलगा आहे. अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत होती, मात्र त्यांचंही ब्रेकअप झालं आहे. तर दुसरीकडे, अनिल आणि जॉयसची दुसरी मुलगी अमृता हिने 2009 मध्ये शकील लडकसोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. अमृताचा सुखाचा संसार सुरू आहे.