कलाकारांच्या बाबतीत नेहमी बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात. या काही अफवांमध्ये सत्य असते तर काही खोट्या असतात. साधारणपणे सेलेब्स या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाहीत, पण अनेकवेळा अशा बातम्याही समोर येतात, ज्यामुळे सेलेब्सना बोलायला भाग पडते. अशीच एक बातमी अलीकडेच आली होती की मलायका अरोरा (Malaika Arora) प्रेग्नंट आहे. यावर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका दोघेही चांगलेच संतापले आहेत. अर्जुन कपूरनंतर मलायकाही न्यूज साइटवर संतापली आहे.
मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही बातमी घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. मलायकाने या फेक न्यूजसाठी न्यूज साईट आणि रिपोर्टरला फटकारले आहे. मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीवर रिपोर्टरच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.
मलायकाने लिहिले आहे की, हे सर्वात निम्न स्तराचं काम आहे जे तुम्ही करू शकता. असंवेदनशील राहून तुम्ही हे सहज लिहिलंय. ते अनैतिक आहे, कचरा आहे. असे खोटे गॉसिप लेख माध्यमांमध्ये पसरतात आणि मग खरे ठरतात. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका.