Join us  

​मलायका अरोराला अभिनयात नाही इंट्रेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 10:11 AM

बॉलिवूडमध्ये आयटम नंबर व फॅशन आयकॉन म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी मलायका अरोरा हिला अभिनयात फारसे स्वारस्य नाही, ...

बॉलिवूडमध्ये आयटम नंबर व फॅशन आयकॉन म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी मलायका अरोरा हिला अभिनयात फारसे स्वारस्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. मलायकाची बॉलिवूड अभिनेत्री म्हणून गणना केली जात असली तरी ती मोठ्या भूमिका साकारताना दिसत नाही. खुद्द मलायकाने आपण बॉलिवूडमध्ये आयटम नंबर करण्यात आनंदी आहोत असे सांगितले आहे. मलायका अरोराने दंबगमधील ‘मुन्नी बदनाम हुई’ व दिल से या चित्रपटातील ‘छैय्या, छैय्या’ यासारख्या गाण्यातून जबरदस्त प्रसिद्धी मिळविली आहे. मलायका फॅशन कॉन्शस असल्याने तिच्या फॅशनचीही चांगलीच चर्चा होताना दिसते. नुकतीच मलायकाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता. यावेळी मलायकाने आपल्या करिअर विषयी सांगितले, मी चित्रपटातील मोठ्या व मुख्य भूमिका साकारू शकत नाही. त्यामुळे आपण आयटम साँग करण्यातच आनंदी आहोत. माझा सुरुवातीपासूनच मोठ्या पडद्याकडे ओढा नव्हता. त्यामुळे मी तसा कधीच प्रयत्न केला नाही. मी आयटम नंबरच्या भूमिका मिळाल्या त्या मी आनंदाने स्वीकारल्या. एका संपूर्ण चित्रपटात काम करण्याचा मी विचारच करीत नाही, असेही मलायका म्हणाली. आपल्या करिअरबद्दल मत मांडताना मलायका म्हणाली, मी आई असल्याने माझ्यावर मुलांची जबाबदारी आहे. म्हणून मी त्यापासून दूर राहते असा जर तुम्ही विचार करीत असाल तर तो चुक आहे, कारण अभिनय हा माझा कधी पिंडच नव्हता. मलायका अरोरा व तिचा पती अरबाज खान यांनी १८ वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोट घेण्याचे ठरविले आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते कायदेशीर विभक्त होतील. दरम्यान तिच्या आयुष्यात अर्जुन कपूर आल्याच्याही चर्चा आहे.