मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमधील तिचे आयटम साँग प्रसिद्ध आहेत. तिच्या डान्सचे आणि कातिल अदांचे लाखो चाहते आहेत. डान्समुळे ओळख मिळवलेल्या मलायकाने अनेक रिएलिटी शोमध्ये परिक्षकाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ती 'हिप हॉप इंडिया सीजन २'मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. १४ मार्चपासून या शोला सुरुवात झाली आहे. पण, या शोच्या ऑडिशनसाठी आलेल्या एका स्पर्धकावर मात्र मलायका भडकली आहे.
'हिप हॉप इंडिया सीजन २'मध्ये ऑडिशन देण्यासाठी उत्तर प्रदेशवरुन नवीन शाह हा १६ वर्षाचा मुलगा आला होता. त्याने ऑडिशनदरम्यान मलायकाकडे पाहून डोळा मारला. एवढंच नव्हे तर त्याने फ्लाइंग किसही दिला. १६ वर्षाच्या मुलाचं हे कृत्य पाहून अभिनेत्री भडकली. मलायकाने त्याला खडे बोल सुनावले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मलायका त्या स्पर्धकाला चांगलच सुनवत असल्याचं दिसत आहे.
"तुझ्या आईचा नंबर दे. १६ वर्षांचा मुलगा आहे आणि माझ्याकडे बघून डान्स करतोय. डोळा मारतोय आणि फ्लाइंग किस करतोय", असं मलायका व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. मलायका ओरडत असल्याचं पाहून स्पर्धक मात्र हसताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.