ठळक मुद्देमलायकाने सांगितले, 20 वर्षांपूर्वी मला टेरेन्स भेटला होता. मी त्याच्या अॅकॅडमीत डान्स शिकत होते आणि आज त्याच्यासोबत बसून एका डान्स शोचे परीक्षण करत आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो- इंडियाज बेस्ट डान्सर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून हा कार्यक्रम 29 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस दिसणार आहेत तर सूत्रसंचालनाची जबाबदारी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सांभाळणार आहेत. या परीक्षकांनी नुकतेच ऑडिशनच्या भागांसाठी चित्रीकरण केले असून यावेळी मलायकाने तिच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी सांगितल्या.
ऑडिशनमध्ये स्पर्धकांना निष्ठेने आणि जिद्दीने परफॉर्म करताना पाहून मलायकाला आपले जुने संघर्षाचे दिवस आठवले. ती म्हणाली, “मी अनेक ऑडिशन्ससाठी जात असे आणि माझी आई त्यावेळी माझ्या सोबत येत असे. सुरुवातीला मला पुष्कळ नकारांना सामोरे जावे लागले. पण त्यामुळे माझा उत्साह कमी झाला नाही. मी उमेद सोडली नाही आणि प्रयत्न करतच राहिले. 17व्या वर्षी मी माझी मॉडेलिंगची कारकीर्द सुरू केली आणि मग त्यानंतर एकातून एक संधी मिळत गेल्या आणि आता मी अशा ठिकाणी आहे की, मी स्वतः परीक्षण करतेय. हे सारे काही सोपे नव्हते. मी जेव्हा 15-16 वर्षांची होते, तेव्हा मला माहीत देखील नव्हते की, मला काय करायचे आहे. पण आता जी मुले ऑडिशनसाठी येतात त्यांना स्वतःला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना असते. 20 वर्षांपूर्वी मला टेरेन्स भेटला होता. मी त्याच्या अॅकॅडमीत डान्स शिकत होते आणि आज त्याच्यासोबत बसून एका डान्स शोचे परीक्षण करत आहे.”
इंडियाज बेस्ट डान्सर 15-30 या वयोगटातील नृत्याच्या वेडाने झपाटलेल्या प्रतिभावंतांना मंच प्रदान करत आहे. अनेक राज्यांमधील शेकडो स्पर्धकांनी या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या असून त्यांना आपल्या सर्वोत्कृष्ट तीन डान्स मूव्ह्ज दाखवून परीक्षकांना प्रभावित करून स्पर्धेत पुढे जायचे आहे. इंडियाज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.