गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून सातत्याने दु:खद बातम्या समोर येत आहेत. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता सी. व्ही. देव यांचं काही वेळापूर्वीच निधन झाल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. त्यामुळे मल्याळम सिनेसृष्टीवर एकावर एक असे दु:खाचे डोंगर कोसळत आहेत.
प्रसिद्ध मल्याळम निर्माते आणि दिग्दर्शक बैजू परावूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी बैजू यांची प्राणज्योत मालवल्यामुळे सध्या सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बैजू यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैजू एका सिनेमावर चर्चा करण्यासाठी कोझिकोड येथे गेले होते. शनिवारी कोझिकोडवरुन परत घरी येत असताना त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कुन्नमकुलम येथे पत्नीच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सासरवाडीला गेल्यावर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
किरकोळ उपचार केल्यानंतर रविवारी ते परवूर येथे त्यांच्या राहत्या घरी आले. परंतु, अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना कुझुपिल्ली येथे पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांना तातडीने कोची येथील रुग्णालयात हलवलं. मात्र, सोमवारी पहाटे त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.दरम्यान, बैजू हे दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत होते. आजवर त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. तसंच लवकरच त्यांचा दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.