मुंबई - अभिनेत्री मल्लिका शेरावतची ओळख बोल्ड अन् बिनधास्त गर्ल म्हणून आहे. चित्रपटातील बोल्ड सीनमुळेच बॉलिवूडमध्ये मल्लिकाची इमेज बोल्ड अभिनेत्री अशीच बनली आहे. मल्लिका जेवढी चित्रपटात बोल्ड दिसते, तितकीच ती वागण्या-बोलण्यातही बोल्ड आहे. आपलं मत मांडताना ती बिनधास्त व्यक्त होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने बिनधास्तपणे आपली मतं मांडली आहेत. तसेच, सिनेमातील बोल्ड सीनबद्दल फक्त अभिनेत्रीलाच का दोषी ठरवले जाते?, असा सवालही मल्लिकाने विचारला आहे.
मल्लिकाने 2003 मध्ये ‘ख्वाहिश’ या सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर 2004 साली आलेल्या ‘मर्डर’ या सिनेमातून ती एका रात्रीत स्टार झाली. ‘मर्डर’ने मल्लिकाला प्रसिद्धी दिली, ग्लॅमर, ऐश्वर्य मिळवून दिले. पण, सोबत लोकांची बोलणीही तिला ऐकावी लागली. त्यांची हेटाळणीही तिला सहन करावी लागली. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने याबद्दलचे दु:ख बोलून दाखवले.
‘मर्डर’मध्ये मी बोल्ड सीन्स दिल्यानंतर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अचानक बदलला. ‘मर्डर’नंतर नैतिकदृष्ट्या लोकांनी माझाही मर्डर केला होता. मला एक वाईट महिला समजू लागले होते. आज मात्र तसे बोल्ड सीन कॉमन गोष्ट झाली आहे, असे ती म्हणाली. तसेच, बोल्ड सीनबद्दल केवळ अभिनेत्रींचीच चर्चा होते, मग अभिनेत्यांची का नाही, असा थेट सवाल मल्लिकाने विचारला आहे. समाज हा बोल्ड सीन करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांमध्ये भेद का करतो, या सीनमधील महिलांनाच टार्गेट केलं जातं. पण, पुरुष अभिनेते या टीकेपासून वाचतात, असे मल्लिकाने म्हटले आहे.
समाजातील ही पितृसत्ताक व्यवस्था आहे, येथे महिलांना सातत्याने लक्ष्य केले जाते, पण पुरुषांना नाही. हे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात हेच पाहायला मिळते. पुरुष काहीही करुन निघून जातात, पण महिलांनाच दोषी ठरविण्यात येते, असे बिनधास्त बोल मल्लिकाने व्यक्त केले आहेत. दरम्यान, सध्या मल्लिका जास्त चित्रपटात दिसत नाही. पण लवकरच ती एका वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मल्लिकाने मर्डरशिवाय बच के रहना रे बाबा, द मिथ, प्यार के साईड इफेक्ट्स, शादी से पहले, आपका सुरूर, दशावतार, हिस्स, डर्टी पॉलिटीक्स अशा अनेक सिनेमात काम केले आहे.