मर्डर, ख्वाहिश, हिस यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. मल्लिका ही फिटनेस फ्रिक असून ती व्यायाम, योगा न चुकता करते. तिने नुकताच योगा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोला तिच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.
मल्लिकाने योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले आहे की, हलासन हे माझे सगळ्यात आवडते आसन असून यामुळे तुमच्या मेंदूला शांतता मिळते. तुमचा ताणतणाव कमी होतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो. मल्लिकाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तिचे शरीर चांगलेच लवचिक असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच योगाप्रती असलेल्या तिच्या प्रेमाचे देखील कौतुक केले जात आहे.
मल्लिकाने बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. मात्र आता ती बॉलिवूडपासून दुरावली आहे. काही दिवसांपूर्वी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने बॉलिवूडपासून दुरावल्याबद्दल सांगितलं की, मला काही चित्रपटात काम मिळालं नाही कारण मी त्या चित्रपटातील हिरोंना डेट करत नव्हते. तिने पुढे सांगितलं की, सिनेइंडस्ट्रीतील हिरो, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत काम करायचे असते. त्यामुळे तिला बऱ्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले.
मीटू मोहिमेवरही ती बोलली होती. ‘इंडस्ट्रीत मला कुणीही सेक्शुअल फेव्हर मागितला नाही. याचे कारण एकच होते. ते म्हणजे मी एक बोल्ड पर्सनॅलिटी आहे. मला असे विचारण्याची हिंमत कुणी करू शकत नाही. मीटू मोहिम एक सकारात्मक पाऊल आहे,’ असे ती म्हणाली होती.
मल्लिकाची ‘बू, सबकी फटेकी’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यात मल्लिकाशिवाय कॉमेडियन कृष्णा अभिषेक, किकू शारदा, शेफाली जरीवाला असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या वेबसीरिजमध्ये मल्लिकाने हसीना नामक मुलीची भूमिका साकारली आहे.