Join us

मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:05 IST

मल्लिका म्हणाली, "हो हे खरं आहे. माझा ब्रेकअप झालं आहे..."

अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) बऱ्याच काळानंतर सिनेसृष्टीत कमबॅक केले. नुकतीच ती 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमात दिसली. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या या सिनेमात तिचीही मुख्य भूमिका आहे. मल्लिकाला कायम बोल्ड अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं. इमरान हाश्मीसोबतचे तिचे इंटिमेट सीन्स खूप चर्चेत आले होते. मात्र कास्टिंग काऊच, गटबाजीला कंटाळून मल्लिका परदेशात स्थायिक झाली होती. तिथे ती एका फ्रेंच मुलाला डेट करत होती. मात्र आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

नुकतंच एका मुलाखतीत मल्लिका शेरावतने लव्ह लाईफवर खुलासा केला. ती म्हणाली, "हो हे खरं आहे. माझा ब्रेकअप झालं आहे. बऱ्याच काळापासून मी आणि सिरिल ऑक्सेनफेंस एकमेकांसोबत होतो. पण आता आम्ही वेगळे झालो आहोत. आजच्या काळात एखादी योग्य व्यक्ती शोधणं हे फार अवघड आहे. मी याविषयी जास्त बोलू शकत नाही. पण सध्या मी सिंगल आहे."

लग्नाविषयी मल्लिका म्हणाली, "मी लग्नसंस्थेच्या ना बाजूने आहे ना विरोधात. मी याचा विचारच करत नाही. दोन लोकांनी ठरवावं की त्यांना नक्की काय करायचं आहे."

मल्लिका शेरावतचा बॉयफ्रेंड सिरिल ऑक्सेनफेन्स फ्रान्सचा नागरिक होता. तो मोठा बिझनेस टायकून होता. रिअल इस्टेट आणि गुंतवणूकीच्या क्षेत्रात तो मास्टर होता. मल्लिका त्याच्यासोबत पॅरिसमध्ये शिफ्ट झाली होती.  मात्र आता मल्लिकासोबत त्याचं नातं कायमचं तुटलं आहे. मल्लिका आता पुन्हा सिनेविश्वात सक्रीय होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. सध्या ती ४८ वर्षांची आहे त्यामुळे तिला आता किती भूमिका ऑफर होतील हेही कोडंच आहे. 

टॅग्स :मल्लिका शेरावतबॉलिवूडरिलेशनशिप