केरळमधील एका अमानुष घटनेने सगळीकडे संताप पसरला आहे़ काही दिवसांपूर्वी केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली होती. एका गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले होते. भुकेल्या हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले ते अननस खाल्ले आणि काही वेळातच तिच्या तोंडात त्याचा स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर तोंडातील दाह, आग शांत करण्यासाठी ही हत्तीण नदीच्या पाण्यात कित्येक तास उभी होती. जबड्यात जखमा आणि वेदना यामुळे ती पाण्याबाहेर यालाही तयार नव्हती. अखेर पाण्यातच मृत्यू झाला होता, ही घटना उघडकीस येताच समाजमन क्षुब्ध झाले. सोशल मीडियावर तर संतापाची लाट उसळली. पण आता साऊथच्या एका अभिनेत्याने हा प्रकार अजाणतेपणी घटल्याचे म्हटले आहे.
होय, मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने एक ट्विट करुन स्थानिकांनी हा प्रकार जाणूनबुजून न केल्याचा दावा केला आहे. नेमके काय झाले असावे, हेही त्याने लिहिले आहे.आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलेय, ‘हत्तीणीला मुद्दाम कोणीही फटाक्यांनी भरलेले अननस खायला घातले नव्हते. नेहमीप्रमाणे प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात असे अननस ठेवले होते. मात्र तोच अननस या गर्भवती हत्तीणीने खाल्ला. हे बेकायदेशीर आहेच. पण या भागात अनेक ठिकाणी पिकांना वाचवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ही घटना पलक्कड जिल्ह्यात घडली आहे, मलप्पुरममध्ये नाही.
तूर्तास सुकुमारनच्या या पोस्टवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी लोकांनी त्याच्या पोस्टचे समर्थन केले आहे तर काहींनी त्याला चांगलेच सुनावले आहे. तुझ्या जवळच्या अशा पद्धतीने जीव गमावला असता तरीही तू असेच म्हटले असते का? असा सवाल अनेकांनी त्याला केला आहे.
पिकांच्या रक्षणासाठी आणि मुक्या प्राण्यांचा जीव घेण्यासाठी इतकी अमानुष पद्धत कशी काय योग्य असू शकते? असा संतप्त सवालही अनेकांनी त्याला केला आहे.
पृथ्वीराज हा एक तामिळ, मल्याळम अभिनेता आहे. 2002 साली नंदनम या मल्याळम सिनेमातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.