Join us  

मल्याळम सिनेसृष्टीत महिलांचं लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा बॉलिवूडवर निशाणा, म्हणाली-"तुम्हाला काम करायचंय तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:32 PM

"विरोधात बोलल्यास वाईट अवस्था...", मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणानंतर बॉलिवूड अभिनेत्री संतापली

गेले काही दिवस मल्याळम सिनेसृष्टीतून महिलांच्या लैंगिक छळाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मल्याळम सिनेसृष्टीचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांचे कास्टिंग काऊचचे अनुभव शेअर करतात. पण, 'वुमन इन सिनेमा कलेक्टिव' (WCC)ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या यौन शोषणाचं हे वास्तव हादरवून टाकणारं आहे. यामध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं समोर आली आहेत. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. 

स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने 'वुमन इन सिनेमा कलेक्टिव' (WCC)चं कौतुक केलं आहे. "मी हेमा कमिटीचा रिपोर्ट वाचला. त्यातील खुलासे हे धक्कादायक आहेत. यातील काही व्यक्ती या प्रसिद्ध आहेत", असं म्हणत स्वरा भास्करने तिचा अनुभव शेअर करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. "शोबिज आता फक्त पितृसत्ताक राहिलेलं नाही. तर आता हे पू्र्णपणे पुरुषांच्या अधीन गेलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देवासमान मानलं जातं. ते जे काही करतात त्याला यश मिळतं. त्यांच्याविरोधात कोणी आवाज उठवला तर त्याची वाईट अवस्था केली जाते. याउलट गप्प राहिल्यास त्यांना बक्षीस दिलं जातं", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"हे जगभरात सगळीकडे घडत आहे. आणि अशाचप्रकारे हे किती नॉर्मल आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्या महिलांना यात दोष देता येणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल, तर हे करावच लागेल. अशी परिस्थिती इथे निर्माण केली गेली आहे. हेमा कमिटी रिपोर्टमध्ये मल्याळम इंडस्ट्रीमधील महिलांचे अनुभव सांगितले गेले आहेत. WCC महिलांनी कमाल केली आहे. त्या एकत्र आल्या आणि त्यांनी न्याय आणि समान वागणुकीसाठी आवाज उठवला आहे. माझ्यासाठी हे दु:खदायक आहे, कारण हे माझ्यासाठी नवीन नाही. भारतातील इतर इंडस्ट्रीत याबाबत बोललं तरी जातं का?", असंही स्वराने म्हटलं आहे. 

दरम्यान, मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या या रिपोर्टनंतर AMMA (the Association of Malayalam Movie Artists) मधील १७ जणांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये सुपरस्टार मोहनलाला यांनीही राजीनामा दिल्याचं समजत आहे.  

टॅग्स :स्वरा भास्करसेलिब्रिटी