गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या दरांनी शंभरी गाठली आहे. साहजिकच सामान्य माणूस इंधनाच्या दरवाढीने मेतकूटीला आला आहे. आता सोशल मीडियावरही इंधन दरवाढीचा मुद्दा गाजतो आहेत. ट्वीट, मिम्स, पोस्टर द्वारे लोक पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करत आहे. अलीकडे बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी सुद्धा या दरवाढीला विरोध केला. आता ‘रंग दे बसंती’ या सिनेमातील अभिनेता सिद्धार्थ इंधन दरवाढीच्या मुद्यावर व्यक्त झाला आहे. ट्वीट करत त्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जोरदार टोला लगावला आहे.
प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पेट्रोल दरवाढीविरोधात दोन वक्तव्यांची तुलना केली होती. 2013 मध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता असताना याच निर्मला सीतारामन यांनी इंधन दरवाढीसाठी सरकारला जबाबदार ठरवले होते. आता भाजपाची सत्ता असताना त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीसाठी तेल कंपन्या जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
प्रशांत भूषण यांच्या या व्हिडीओवर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मामी, ज्यावर विश्वास ठेवते, त्यानुसार स्वत:ला बदलते. ना कांदा, ना स्मरणशक्ती, ना कुठला सिद्धांत... मामी रॉक्स,’ असे उपरोधिक ट्वीट सिद्धार्थने केले आहे.सिद्धार्थ हा साऊथचा लोकप्रिय चेहरा आहे. तामिळ, तेलगू सिनेमात त्याने काम केले आहे. 2003 मध्ये ‘बॉयज’ हा त्याचा पहिला सिनेमा होता. यानंतर मणिरत्नम यांच्या ‘आयुथा एझुथा’ या सिनेमात त्याला संधी मिळाली. काही तामिळ सिनेमे केल्यानंतर त्याने तेलगू सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. आमिर खानसोबत ‘रंग दे बसंती’ या सिनेमाने सिद्धार्थला नवी ओळख दिली. लवकरच तो इंडियन 2, नवरस आणि महासमुद्रम या सिनेमात दिसणार आहे.