Join us

"धीरेंद्र शास्त्रींचं जितकं वय तितकी तर माझी तपस्या", ममता कुलकर्णीने सर्व आरोपांवर दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:08 IST

ममता कुलकर्णीने 'महामंडलेश्वर' होण्यासाठी १० कोटी दिले? म्हणाली...

९० त्या दशकातली अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni)  सध्या वेगळ्याच कारणामुळे  चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने महाकुंभ येथे शाही स्नान केलं. यासोबतच तिने संन्यास घेत असल्याची घोषणा केली. नंतर किन्नर आखाड्याने तिला 'महामंडलेश्वर' बनवलं. यानंतर मोठा वाद झाला. बाबा रामदेव, धीरेंद्र शास्त्री यांसारख्या महंतांनी यावर टीका केली. ७ दिवसात तिच्याकडून ही पदवी काढली गेली. नुकतीच ममता कुलकर्णीने 'आप की अदालत' कार्यक्रमात हजेरी लावली. यात तिने सर्व आरोपांवर उत्तर दिलं.

ममता कुलकर्णीला 'आप की अदालत' मध्ये बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोपांवर विचारण्यात आलं. 'आजकाल कोणालाही पकडून महामंडलेश्वर बनवतात' असं बाबा रामदेव म्हणाले होते. यावर ममता कुलकर्णी उत्तर देत म्हणाली, "आता मी यावर काय बोलू. त्यांना महाकाल आणि महाकालीचा धाक वाटला पाहिजे." 

तर धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, 'महामंडलेश्वर बनण्यासाठी ५०-५० वर्ष तपस्या करावी लागते. आजपर्यंत मलाही बनता आलेलं नाही, ही कशी बनली?' यावर ममता कुलकर्णीने रोखठोक उत्तर दिलं. ती म्हणाली, "ते भोळे धीरेंद्र शास्त्री... त्यांचं वय २५ वर्ष आहे तितकी तर माझी तपस्या आहे. त्यांना हनुमानजींची सिद्धी प्राप्त आहे. मला माझ्या २३ वर्षांच्या तपस्येत दोन वेळा हनुमानजींचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे. धीरेंद्र शास्त्रींचे गुरु रामभद्राचार्य आहेत. मी धीरेंद्र शास्त्रींना सांगू इच्छिते की त्यांच्या गुरुंकडे दिव्य दृष्टी आहे. आपल्या गुरुंना विचारा की मी कोण आहे आणि गप्प बसा."

महामंडलेश्वर बनण्यासाठी १० कोटी दिल्याचा आरोप आणि टॉपलेस फोटोशूटच्या वादावर ममता कुलकर्णी म्हणाली, " दूधाचं तूप होतं झाल्यावर परत त्याला दूध बनवू शकत नाही. तसंच मी आता सिनेमांमध्ये पुन्हा येऊ शकत नाही. मी कधीच येणार नाही. जे लोक २-३ वर्षांनंतर सिनेसृष्टीत परत आलेत त्यांना ब्रह्मविद्याचं ज्ञान नाही. ज्यांना ज्ञान आहे ते असं करणार नाहीत."

टॅग्स :ममता कुलकर्णीबागेश्वर धामरामदेव बाबाबॉलिवूड