Join us

Mamta Mohandas : कॅन्सरनंतर अभिनेत्रीचा ऑटोइम्युन आजाराशी लढा; सेल्फी शेअर करत म्हणाली "मी माझा रंग गमावतेय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:59 AM

Mamta Mohandas : अभिनेत्री ममता मोहनदासने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री ममता मोहनदासने (Mamta Mohandas) एक धक्कादायक खुलासा केला आहे. ममताने रविवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सेल्फी पोस्ट केले आणि चाहत्यांना सांगितलं की ती एका मोठ्या ऑटोइम्युन आजाराचा सामना करत आहे. विटिलिगो (autoimmune disease vitiligo) या आजाराशी झुंज देत असल्याचं तिने सांगितलं. तसेच या आजारामुळे ती तिचा रंग गमावतेय, असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काळा टी-शर्ट, टाइट्स, जॅकेट आणि हातात कप अशा लूकमध्ये ममता पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "प्रिय सूर्य, मी तुझ्या किरणांना आता अशा पद्धतीने अनुभवतेय, जसं याआधी मी कधीच अनुभवलं नव्हतं. माझ्या शरीरावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावते आहे. आता मी पहाटे तुझ्याही आधी जागी होते. धुक्यातून तुझ्या प्रकाशाचा पहिला किरण बाहेर पडताना पाहण्यासाठी... मला ते सर्व दे जे तुझ्याकडे आहे. मी कृतज्ञ आहे" असं लिहिलं आहे. 

या पोस्टमध्ये ममताने कलर, ऑटोइम्युन आजार, विटिलिगो आणि सनलाइट असे हॅशटॅग वापरले आहेत. ममताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री रेबा मोनिका जॉनने "तू लढवय्यी आहेस आणि तू सुंदर आहेस" असं लिहिलं आहे. याआधी ममताने कॅन्सरवर यशस्वी मात केली. 

काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने अमेरिकेत त्यावर उपचार घेतले. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. "आजारपणाआधी मी जितकी कणखर होती, तितकीच मी आताही आहे असं मी बोलू शकत नाही. मी अशी व्यक्ती होती, जी कोणाबद्दलच चिंता करायची नाही. मात्र माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच घाबरतेय. सकारात्मक राहा, हे बोलणं खूप सोपं असतं" असं म्हटलं आहे. 

विटिलिगो नेमकं काय आहे?

विटिलिगो हा एक ऑटोइम्युन आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या त्वचेचा रंग उडू लागतो. त्याच्या शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात. वेळेनुसार हे डाग वाढू लागतात. ममता मोहनदासने 2005 मध्ये मल्याळम चित्रपटातून अभिनयविश्वात पदार्पण केलं. मल्याळमसोबतच तिने काही तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. ममता ही प्रसिद्ध पार्श्वगायिकासुद्धा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"