अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं निधन होऊन तीन वर्षे झाली आहेत. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच याबद्दल बोलली आहे. ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "तीन वर्षांत पहिल्यांदाच मी याबद्दल बोलत आहे. कोणत्याही कार्यक्रमाला किंवा मुलाखतीला गेल्यावर मी आधीच सांगते. त्याबद्दल बोलू नका. मी आणि माझी मुलं राजबद्दल रोज विचार करतो."
"आम्ही त्याला अजिबात विसरलो नाही. प्रत्येक सणाला आणि प्रत्येक प्रसंगी मला त्याची आठवण येते. कधी कधी त्याच्या गाण्यांमुळे तो मला आठवतो. मला रडायचं नाही पण अश्रू आले. राजच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मी थेरपी घेतली आहे. आजही मी थेरपी घेते. अशी व्यक्ती आपल्याला नेहमी हवी असते, जिच्याशी आपण बोलू शकतो."
"राजच्या मृत्यूनंतर दोनच महिन्यांनी मी कामावर परतले, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची होती. मुलांना वाढवायचं होतं. मी कायम उदास राहू शकत नाही. कारण मला माझ्या मुलांना घरात आनंदी वातावरण द्यायचं आहे. दुःख आहे जे कधीही संपणार नाही, परंतु मी त्याबद्दल कायम रडत राहू शकत नाही."
"कोविडमध्ये मी शिकले की तुम्ही दररोज प्रत्येक गोष्टीसाठी आभारी असलं पाहिजे. माझं वय आणि वजन यामुळे लोक मला ट्रोल करतात. ती म्हातारी झाली आहे असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर मी अशा लोकांकडे लक्ष देणं बंद केलं आहे कारण ते माझं घर चालवायला येणार नाहीत" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी जवळपास २३ वर्षे खूप प्रेम आणि काळजी घेऊन त्यांच्या लग्नाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवला होता. दोघांनी 1999 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर २०११ मध्ये मुलगा वीरचा जन्म झाला. या दोघांनी २०२० मध्ये एक मुलगी दत्तक घेतली.