‘पोन्नियीन सेल्वन’ (Ponniyin Selvan ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार हवा आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला एका बॉलिवूड सुपरस्टारने आवाज दिला आहे. सध्या त्याचीही चर्चा होतेय. होय, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सुपरस्टार अजय देवगणने ( Ajay Devgn) आपला आवाज दिला आहे. चित्रपटात नरेटर म्हणून अजयचा व्हाईस ओव्हर आहे. अनिल कपूरने चित्रपटाच्या ट्रेलरला आवाज दिला आहे. ‘पोन्नियीन सेल्वन’चे दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam ) यांनी या दोन्ही स्टार्सचे विशेष आभार मानले आहेत.
कमल हासनला घ्यायचं होतं, पण...‘पोन्नियीन सेल्वन’बद्दल मणिरत्नम यांनी एक खास खुलासा केला आहे. होय, आपल्या चित्रपटात त्यांना कमल हासन (Kamal Haasan) यांना घ्यायचं होतं. त्यांनी सांगितलं, 30 वर्षांपूर्वी मला कमल हासनसोबत हा सिनेमा बनवायचा होता. कमलही या चित्रपटात काम करण्यास उत्सुक होता. चित्रपटाची स्क्रिप्ट लिहण्याआधीच आमच्याकडे एक हिरो होता आणि तो कमल हासन होता. पण तेव्हा हा सिनेमा बनू शकला नाही. कारण हा खूप मोठा सिनेमा होता आणि तो एका पार्टमध्ये बनणं शक्य नव्हतं. यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे, कमल हासन सारख्या मोठ्या स्टारला आम्ही अफोर्ड करू शकत नव्हतो.
मणिरत्नम यांचा ‘पोन्नियीन सेल्वन हा लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात चोल साम्राज्याची कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, शोभिता धुलिपाला आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर 500 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.