Join us

Video :‘अल्लाह के बंदे’ गात गायकाने घेतला अखेरचा श्वास, कैलाश खेरने शेअर केला इमोशनल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 1:38 PM

Manipuri Singer Suren Yumnam Passed Away : मणिपुरचा लोकप्रिय गायक सुरेन युमनाम याने वयाच्या 35 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या सुरेनवर दीर्घकाळापासून उपचार सुरू होते...

मणिपुरचा लोकप्रिय गायक सुरेन युमनाम (Suren Yumnam) याने वयाच्या 35 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या सुरेनवर दीर्घकाळापासून उपचार सुरू होते. पण नुकतंच उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. सुरेनचा रूग्णालयातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सुरेनचा अखेरचा व्हिडीओ ठरला. सुरेन बऱ्याच दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत होता. पण अखेरच्या श्वासापर्यंत तो लढत राहिला. सकारात्मक राहिला आणि जाता जाता लोकांना सकारत्मकतेचा संदेश देऊन गेला. सुरेनच्या निधनानंतर त्याचे चाहते शोकाकुल आहेत.  बॉलिवूड सिंगर कैलाश खेर ( Kailash Kher) यानेही सुरेनचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

व्हिडीओत सुरेन रूग्णालयाच्या बेडवर लेटलेला दिसतो. त्याच्या आजूबाजूला उपचारासाठीच्या मशिन्स दिसत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही तो कैलाश खेर यांचे ‘अल्लाह के बंदे’ हे गाणं  गाताना दिसत आहे.

सुरेनच्या निधनानंतर कैलाश खैरने त्याचा हा व्हिडीओ शेअर करत, त्याला भावुक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ मणिपूरचा लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गायक सुरेन युमनाम उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर  अल्लाह के बंदे  गाताना... काल मणिपूर येथे आपल्या आजारपणामुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. पण आपल्या सर्वांना हसत हसत जगण्याचा संदेश देत निघून गेला... हा व्हिडीओ पाहिला तेव्हा खूप दु:ख झालं. त्याचं गाणं ऐकलं आणि त्याची जीवन जगण्याची इच्छाशक्ती बघितली. मणिपूरच्या लोकांनी त्याच्या उपचारासाठी जमा केलेल्या रकमेबद्दल कळल्यावर आनंद झाला. लोकांनी त्याच्या उपचारासाठी 58,51,270 रूपये गोळा केलेत. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि  मणिपूरच्या लोकांचे भलं करो...,’असं कैलाश खेर यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे.  

टॅग्स :कैलाश खेरसेलिब्रिटी