Join us

मनीष पॉलच्या या जाहिरातीनेही ओढवून घेतला वाद, काश्मिरींची बदनामी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 4:17 PM

ही जाहिरात मागे घे किंवा यानंतर कधीच काश्मीरात येऊ नकोस...

ठळक मुद्देएका युजरने मनीषला पुन्हा कधीच काश्मीरात न येण्याबद्दल बजावले. ही जाहिरात मागे घे किंवा यानंतर कधीच काश्मीरात येऊ नकोस, असे या युजरने लिहिले.

काही दिवसांपूर्वी तनिष्कच्या जाहिरातीने वाद ओढवून घेतला होता. यानंतर रणवीर सिंगच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या जाहिरातीने वाद ओढवून घेतला होता. आता  टीव्ही होस्ट व अभिनेता मनीष पॉल याच्या नव्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. होजरी ब्रँडच्या या जाहिरातीत  काश्मिरींची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप केला जात आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी  ही जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे.

तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. ‘नोनू चिडियाने दिग्दर्शित  केलेली  ही नवी जाहिरात तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय,’असे ही जाहिरात शेअर करताना त्याने लिहिले होते. जाहिरातीत मनीष पॉल आपल्या जोडीदाराबरोबर सेल्फी घेत असता तेथे एक चोर येतो आणि त्याचे स्वेटर ओढून तेथून पळ काढतो. मनीष त्याचा पाठलाग करतो आणि मग ते दोघे एका तलावाच्या काठावर जाऊन थांबतात. यानंतर मनीष आणि त्याची जोडीदार त्यांचे सर्व कपडे चोराला देतात.

मनीषने ही जाहिरात शेअर केली आणि यावरून वाद सुरु झाला. ही जाहिरात काश्मिरींच्या भावना दुखावणारी आणि त्यांचा अपमान करणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

‘मनीष पॉल ही जाहिरात अपमानास्पद आहे. ही जाहिरात काश्मिरींच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या पाहुणचारासाठी जगभर ओळखले जातो. मात्र तुम्ही आम्हाला चोर म्हणून दर्शवले.  काश्मीरमधील पर्यटकांविरूद्ध गुन्हेगारीचे प्रमाण शून्य टक्के आहे, अशा शब्दांत एका युजरने या जाहिरातीवर संताप व्यक्त केला.

एका युजरने तर मनीषला पुन्हा कधीच काश्मीरात न येण्याबद्दल बजावले. ही जाहिरात मागे घे किंवा यानंतर कधीच काश्मीरात येऊ नकोस, असे या युजरने लिहिले. तू काश्मिरींना चोर दाखवून आमचा अपमान केला. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. काश्मीर पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित स्थान आहे,असे एका युजरने लिहिले. 

टॅग्स :मनीष पॉल