अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आज वाढदिवस साजरा करत आहे. ९० च्या दशकात तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'मन','बॉम्बे','1942 अ लव्ह स्टोरी' अशा अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. मात्र वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली. आधी घटस्फोट, नंतर कॅन्सरशी झुंज यामुळे तिची झालेली अवस्था प्रेक्षकांनी पाहिली. या काळात मनिषाला बॉलिवूडमधून कोणीही मदत केली नाही. मात्र तिने इंडस्ट्रीचं मन सोन्याचं आहे असं वक्तव्य केलं.
मनिषा म्हणाली, 'फिल्मइंडस्ट्रीने मला चांगल्या प्रकारे स्वीकारलं. मला प्रेम आणि सम्मान मिळाला. बॉलिवूड आऊटसायडर्सचं दिलखुलासपणे स्वागत करतं. मला असं वाटतं फिल्मइंडस्ट्रीचं मन सोन्याचं आहे. जगातील वेगवेगळ्या भागातून कलाकार इथे येतात. इंडस्ट्रीने मला नेहमीच आपलं मानलं.'
मनिषा पुढे म्हणाली, 'नेपाळला घरी लोक मला विचारतात की मला बॉलिवूडने कधी साईडलाईन केलं का? मी त्यावर हेच सांगते की मला जे प्रेम इथे मिळालं यानंतर कोणतेच प्रश्न उरत नाहीत. शेवटी तुम्ही स्वत:ला कसं सिद्ध केलंत हेच महत्वाचं आहे. तुम्ही किती चांगले कलाकार आहात, प्रोफेशनल आहात का यावरच सगळं अवलंबून असतं. आजही महिलांना अनेक संधी मिळत आहेत. मन सिनेमाच्या शूटिंगवेळी सेटवर फक्त एक महिला हेअरड्रेसर होती. बाकी सगळे पुरुष होते. मी महिला मेकअप आर्टिस्टची मागणी केली. मला आनंद आहे यानंतर हळूहळू नियम बदलले. पण आजही मी सांगते की इंडस्ट्रीत महत्वाच्या हुद्द्यांवरही महिला असल्या पाहिजेत.'
मनिषा लवकरच संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' सिनेमात दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमात तिने त्याच्या आईची भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या आयुष्यावर हा चित्रपट होता.